स्वामी आनंद स्वरूप यांच्या वक्तव्याचा निषेध
-------------------
डॉ. आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह विधान, कारवाईची मागणी
------------------
राजेंद्र जैन / कडा
-----------------
संविधानाच्या पवित्र मूल्यांवर प्रहार करणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विवेक विचार मंचच्या वतीने या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. स्वामी आनंद स्वरूप यांनी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अनुसूचित समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर ॲड. प्रबोधन निकाळजे यांनी आष्टीच्या तहसीलदारांकडे निवेदन सादर करून संबंधितांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित व्यक्तीने मनुस्मृती व चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करत संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वांनाच आव्हान दिले आहे. ही विधाने समाजात तेढ निर्माण करणारी असून, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ अंतर्गत गंभीर गुन्हा ठरू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करून संविधानविरोधी विचारांना आळा घालावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी महादेव कांबळे, अशोक बावणे, किरण जगताप, अमोल धोत्रे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह संबंधित पोलीस प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत.
-------%-------


stay connected