महावीर जयंतीनिमित्त आष्टीत कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय — नगराध्यक्ष जिया बेग

 महावीर जयंतीनिमित्त आष्टीत कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय
— नगराध्यक्ष जिया बेग






आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी शहरात जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि.३१ मार्च रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण शहरात ही जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्याची तयारी सुरू आहे.

महावीर जयंती हा जैन समाजासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसा, सत्य, करुणा आणि सर्व जीवांप्रती दया या मूल्यांचा संदेश लक्षात घेता, या दिवशी शहरात कोणत्याही प्रकारची जीवहानी होऊ नये, यासाठी आष्टी नगरपंचायतीने विशेष निर्णय घेतला आहे.

नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी महावीर जयंतीनिमित्त आष्टी शहरातील सर्व कत्तलखाने तसेच मटण, चिकन आणि मासे विक्री करणारी दुकाने दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयामागे धार्मिक भावना जपणे, तसेच शहरात शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम ठेवणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, महावीर जयंतीनिमित्त शहरात प्रभात फेरी, धार्मिक मिरवणुका, प्रवचने आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात दिवसभर उत्सवी वातावरण राहणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जयंतीचे पावित्र्य अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या आदेशाचे सर्व संबंधित मांस विक्रेते, कत्तलखाना चालक तसेच नागरिकांनी सहकार्य करून काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष जिया बेग यांनी केले आहे. 

महावीर जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरात स्वच्छता, शांतता आणि धार्मिक एकात्मतेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आष्टी नगरपंचायतीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही नगराध्यक्ष जिया बेग नमूद केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.