सुरेश धस यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी; समर्थकांची पोलिसांत तक्रार
आष्टी (प्रतिनिधी) : आष्टी-पाटोदा-शिरूर कासार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा लोकप्रिय लोकनेते सुरेश धस यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि जीवे मारण्याची उघड धमकी देणारी पोस्ट व्हायरल झाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आ. धस यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन आष्टी, अंभोरा आणि कडा येथे लेखी तक्रार दाखल करून संबंधितावर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी फेसबुक या सामाजिक माध्यमावर एका व्यक्तीच्या अकाउंटवरून आ. धस यांच्याविरोधात अत्यंत भडकावू व धमकीच्या स्वरूपाचा मजकूर पोस्ट करण्यात आला. संबंधित पोस्टमध्ये आ. धस यांचा उल्लेख करत उघड इशारा देण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, सदर पोस्टचा सरळ अर्थ आमदारांना जीवे मारण्याची धमकी असा होत असून, त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदार व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे समर्थकांमध्ये संतापाची भावना निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असेही तक्रारदारांनी म्हटले आहे.
लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींविरुद्ध उघड धमक्या देणे ही अत्यंत गंभीर व दंडनीय बाब आहे. सामाजिक माध्यमांचा गैरवापर करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही समर्थकांनी केला आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संबंधित पोस्टची पडताळणी सुरू केली असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या घटनेच्या निषेधार्थ आष्टी, अंभोरा व कडा येथे आ. धस यांचे हजारो समर्थक उपस्थित राहून संताप व्यक्त केला.



stay connected