शेतकरी आत्महत्या ग्रस्त महाराष्ट्रात अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेला भेटलेले ‘थ्री इडियटस’ three Ediots

 शेतकरी आत्महत्या ग्रस्त महाराष्ट्रात अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेला भेटलेले ‘थ्री इडियटस’




पुणे, ता. २५ : राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या होत असल्याची कबुली महाराष्ट्र सरकारने नुकतीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील सकारात्मक, स्वयंपूर्ण आणि निर्यातक्षम मॉडेल्स पुढे आणण्यासाठी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुढाकार घेत आहे. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेने ‘शून्यातून विश्व निर्माण’ करणाऱ्या तीन कृषी उद्योजकांच्या कार्याची दखल घेत त्यांना भेट दिली.


१) ८० एकरांवर दररोज ५० हजार पेंडींचे उत्पादन : गायकवाड बंधूंचा आदर्श


यवत परिसरातील सुमारे ८० एकर माळ भाडेकराराने घेऊन दररोज सुमारे ५० हजार पेंडी भाजीपाला उत्पादन करणारे गायकवाड बंधू हे कृषी व्यवस्थापनातील एक यशस्वी मॉडेल ठरत आहेत. नितीन गायकवाड उत्पादनाची जबाबदारी सांभाळतात, तर सचिन गायकवाड पुण्यातील गुलटेकडी मार्केटमधील स्वमालकीच्या गाळ्यातून थेट विक्री करतात.


वडकी (ता. हवेली) येथील ‘स्वयंपूर्ण गाव’ संकल्पनेला चालना देणारे माजी उपसरपंच तात्या गायकवाड यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे. उत्पादन ते विक्री अशी साखळी उभी करून मूल्यवर्धन आणि थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.


२) सेंद्रिय शेतीचा जागतिक मार्ग : डायना बायोटेकचा उपक्रम


भांडगाव परिसरातून जागतिक दर्जाच्या निर्यात करणाऱ्या डायना बायोटेकचे प्रमुख डॉ. विनोदकुमार पाटील यांनी सेंद्रिय शेती हा आगामी काळातील शाश्वत पर्याय असल्याचे स्पष्ट केले. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक मातीची सुपीकता घटवतो, पाण्याचे प्रदूषण वाढवतो आणि अन्नसाखळीतून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करतो, असे त्यांनी नमूद केले.


राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी असून निर्यातक्षम शेतीसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य शासन सेंद्रिय शेतीस अधिक प्रभावी प्रोत्साहन देतील, असेही त्यांनी सांगितले.


३) जागतिक फुलांची विक्री साखळी : आयात ते वितरण


विजय कुंजीर आणि संतोष काळभोर यांनी भागीदारीतून परदेशातून शोभिवंत फुलांच्या जाती आयात करून पंजाब, डेहराडून आणि पुणे येथे आठ ठिकाणी विक्री व्यवस्थापन उभारले आहे. आयात होणाऱ्या कंटेनरच्या क्लीअरन्समधील अडचणींबाबत संघटनेकडे मांडणी करण्यात आली. या प्रश्नावर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन संघटनेच्या वतीने देण्यात आले.


वडकी येथे सेंद्रिय शेतीचा पायलट प्रकल्प


राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनाच्या समन्वयाने वडकी (ता. हवेली) येथील गायकवाडवाडीमध्ये सेंद्रिय शेतीचा पायलट प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “गावे स्वयंपूर्ण आणि शेतकरी अभ्यासपूर्ण आर्थिक प्रगतीकडे” या ध्येयाने हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.


सेंद्रिय शेती प्रसारासाठी सामंजस्य करार


सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार, प्रशिक्षण शिबिरे आणि जनजागृती मोहिमा गावागावात राबविण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला. डायना बायोटेक आणि अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्यात सेंद्रिय शेती प्रसारासाठी सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यासाठी ॲड. अमोल पाटील आणि डॉ. विनोदकुमार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.


या भेटीत संघटनेचे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. अमोल पाटील ,

शहराध्यक्ष महेश टेळे पाटील ,

संघटक श्री लहू पारवे 

कार्याध्यक्ष तथा सुदर्शन टीव्हीचे ब्युरो चीफ विजय रणदिवे

उपसरपंच मच्छिंद्र गायकवाड वडकी ग्रामपंचायत ,देऊळगाव गाड्याचे सरपंच विशाल बारवकर ,मार्केट यार्ड पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक गणेश गायकवाड,

घनश्याम सोनी ,नामदेव निकम ,प्रदीप खताळ उपस्थित होते 

तळागाळातील कर्तृत्ववान शेतकरी, त्यांचे प्रश्न आणि सकारात्मक मॉडेल्स शासन व समाजापुढे आणण्याचे कार्य डिजिटल माध्यमांच्या बळावर केले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या बांधापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आवाज पोहोचविण्याची क्षमता हीच डिजिटल मीडियाची खरी ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.