डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप; पाच दिवसात दोन लाख तीस हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती
आष्टी (प्रतिनिधी) दि. २३/०२/२०२६
आष्टी येथे दिनांक १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात समारोप करण्यात आला. पाच दिवस चाललेल्या या भव्य कृषी प्रदर्शनाने केवळ आष्टी तालुक्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक, महिला बचत गट, कृषी तज्ज्ञ, विद्यार्थी व नागरिकांना एकत्र आणले. संयोजकांच्या माहितीनुसार, पाच दिवसांत सुमारे २ लाख ३० हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनास भेट देत विक्रमी प्रतिसाद नोंदविला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते अभय राजे धोंडे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून व राज्य गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक श्रीराम आरसूळ यांनी केले. संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा. शिवदास विधाते यांनी प्रदर्शनाच्या नियोजनाची, विविध तांत्रिक आणि स्टॉल व्यवस्थापनाची सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून दिली.
मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती
या समारोप प्रसंगी महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र (राजू काका) धोंडे, आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोकरावजी साळवे, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, पंचायत समिती पाटोदा माजी सभापती अनिल जायभाय, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे, माजी सरपंच संतोष भैय्या चव्हाण, संभाजी जगताप, हरिभाऊ जंजिरे, कुंडलिक आस्वर, व्यवस्थापन मॅनेजर वाबळे सर, युवराज खटके, जिजाऊ मसाले उद्योगाचे प्रमुख बाबासाहेब गर्जे, संस्थेचे प्रशासनाधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्रा. शिवदास विधाते, प्रा. सागर वाघुले, प्रा. संदीप नन्नवरे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम आरसूळ, सर्व प्राध्यापक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी, पत्रकार बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतीश आबा शिंदे यांचे प्रभावी मनोगत
माजी जि.प. सदस्य सतीश आबा शिंदे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, मोठ्या शहरांतील कृषी प्रदर्शनांना तिकीट घेऊन प्रवेश करावा लागतो; मात्र धोंडे साहेबांच्या संकल्पनेतून आष्टीत शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.
शेतकऱ्यांना लागणारी आधुनिक कृषी अवजारे, कीड व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, आंतरमशागत तंत्रज्ञान, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे तसेच अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे शेत निरीक्षण यांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून देण्यात आली. महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढील वर्षी आणखी व्यापक नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी आपल्या भाषणात शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा गौरव करत आष्टी मतदारसंघ कोरडवाहू असूनही शिक्षण व कृषी क्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्याचे सांगितले.
प्रदर्शनादरम्यान सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या मसाल्यांची विक्री झाल्याचे त्यांनी नमूद करत स्थानिक उत्पादकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे समाधान व्यक्त केले. जलव्यवस्थापन, आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञान, जलजीवन मिशन यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र धोंडे यांचे मार्गदर्शन
राजेंद्र धोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या प्रदर्शनाने राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र आणले. उद्घाटनानंतर विविध तांत्रिक सत्रे, मार्गदर्शन कार्यशाळा, कृषी तज्ञांचे व्याख्यान, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली.
कृषी महाविद्यालय आष्टी, प्रशासन अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वी झाला, असे त्यांनी नमूद केले.
स्टॉलधारकांचा गौरव
समारोप प्रसंगी सर्व सहभागी स्टॉलधारकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी अवजारे, बियाणे, खते, सेंद्रिय उत्पादने, प्रक्रिया उद्योग, महिला बचत गटांचे स्टॉल, मसाला उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या आदी विविध क्षेत्रांतील स्टॉल्सना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊ सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषी तत्त्वज्ञानाला साजेसा हा उपक्रम शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योग, विपणन कौशल्य आणि निर्यात संधी यांची नवी दिशा देणारा ठरला. आष्टी तालुक्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतल्याने हा उपक्रम राज्यस्तरावर आदर्श ठरला आहे.


stay connected