मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा
आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन बैठक
आष्टी (प्रतिनिधी)
सावरगाव मायंबा येथील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळा १८ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला वर्षातून एकदाच ही संजीवन समाधी भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जाते. या पवित्र सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नाथभक्त उपस्थित राहत असतात.
या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी देवस्थानचे विश्वस्त तथा आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस, महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, पाणीपुरवठा तसेच इतर सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत भाविकांच्या सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये दर्शन रांग व्यवस्था, व्हीआयपी दर्शन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, मोफत अन्नदान, कावड व्यवस्था, मळी काढणे, सुरक्षा व्यवस्था, विद्युत व पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच इतर आवश्यक व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला संजीवन समाधी उघडण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी ती पुन्हा झाकण्यात येते. या कालावधीत मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीवर गंगाजल व चंदनाने अभिषेक करण्यात येतो. यावेळी मोठी यात्रा भरत असून हा सोहळा नाथभक्तांसाठी श्रद्धा व भक्तीचा केंद्रबिंदू ठरतो.
नाथ संप्रदायातील ही प्राचीन अध्यात्मिक परंपरा श्रद्धा व भक्तीचे प्रतीक मानली जाते. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव मायंबा हे नाथ संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून या संजीवन समाधी सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.


stay connected