आष्टी तालुक्यात जिओ नेटवर्कचा मोठा फटका – वारंवार सेवा खंडित, नागरिक त्रस्त

 आष्टी तालुक्यात जिओ नेटवर्कचा मोठा फटका – वारंवार सेवा खंडित, नागरिक त्रस्त

तेजवार्ता


आष्टी | प्रतिनिधी ( राजू गायकवाड ) -

आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात रिलायन्स जिओच्या नेटवर्क सेवेमध्ये सतत अडथळे येत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. धानोरा, हिवरा, पिंपरखेड आणि सुलतान देवळा परिसरात जिओचे नेटवर्क व इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाईलवर पूर्ण रेंज दाखवत असतानाही अचानक कॉल बंद होणे, आवाज स्पष्ट न ऐकू येणे, कॉल ड्रॉप होणे तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडणे अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत.

ऑनलाइन व्यवहार ठप्प, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान

या तांत्रिक अडचणींचा सर्वाधिक फटका ऑनलाइन व्यवहारांवर बसत आहे. बँकिंग व्यवहार, ऑनलाइन पैसे भरणे, सरकारी पोर्टलवरील सेवा तसेच शेतकऱ्यांचे विविध अर्ज भरणे अशा महत्त्वाच्या कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यासक्रम, परीक्षा तयारी आणि असाइनमेंट पूर्ण करणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंटरनेटच्या समस्येमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

व्यापाऱ्यांच्या डिजिटल व्यवहारावर परिणाम

स्थानिक व्यापाऱ्यांचे डिजिटल पेमेंट व्यवहारही या नेटवर्क समस्येमुळे ठप्प झाले आहेत. ग्राहकांकडून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यात अडचणी येत असून अनेक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्राहकांचा जिओवरून विश्वास उडाला, पोर्टिंगला सुरुवात

सततच्या त्रासामुळे अनेक ग्राहकांनी आता आपली जिओ सिम इतर टेलिकॉम कंपन्यांकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. “सेवा सुधारली नाही तर जिओचा वापर बंद करावा लागेल,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली.

नेटवर्क समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी

ग्रामीण नागरिकांनी मागणी केली आहे की, जिओ कंपनीने या नेटवर्क समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

ग्राहक मंचाकडे तक्रार करणार

जिओ कंपनी च्या नेटवर्क गुल होण्याच्या समस्येमुळे त्रस्त नागरिक म्हणतात की मुदत संपण्य आधीच पुन्हा रिचार्ज करा अशा सूचना कंपनी देते मात्र अनेकदा नेटवर्क नसल्यामुळे डाटा वाया जातो त्याची भरपाई मात्र कंपनी देत नाही . जर ग्राहक मंचात तक्रार दाखल केली तर कंपनीला सर्व ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल अशी चर्चा नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.