आष्टी येथे १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन बीड येथे नियोजन बैठक संपन्न
आष्टी (प्रतिनिधी) –
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी तसेच शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग, संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आष्टी येथे दिनांक १९ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण व बहुप्रतीक्षित कृषी प्रदर्शनाच्या यशस्वी नियोजनासाठी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब यांच्या उपस्थितीत बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या दालनात सविस्तर आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत कृषी प्रदर्शनाच्या संपूर्ण नियोजनाबाबत तपशीलवार चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित वाणांची माहिती, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, सूक्ष्म सिंचन पद्धती, जलसंधारण, पीक संरक्षण, खत व्यवस्थापन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय तसेच कृषी प्रक्रिया उद्योगाची माहिती प्रत्यक्ष पाहता व समजून घेता यावी, या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. स्वामीनाथन यांच्या विचारांवर आधारित हे कृषी प्रदर्शन शेतकरी केंद्रित, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, खर्च कमी करणाऱ्या शेती पद्धती आणि बाजारपेठेशी थेट जोड निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
या उच्चस्तरीय बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुभाष साळवे, कृषी उपसंचालक श्री. दादाराव जाधवर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. उद्धव गर्जे, कृषी विकास अधिकारी श्री. साहिल सय्यद, मोहीम अधिकारी श्री. सय्यप्पा गरांडे, तालुका कृषी अधिकारी आष्टी श्री. गोरख तरटे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्री. वल्लभ भोसले, कृषी अधिकारी श्री. आंधळे, आत्मा प्रकल्पाचे श्री. राजेंद्र धोंडे, इव्हेंट मॅनेजमेंटचे श्री. अजय वाबळे यांच्यासह कृषी विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रदर्शनातील विविध दालनांची रचना, कृषी यंत्रसामग्री व अवजारे, बी-बियाणे व खते उत्पादक कंपन्यांचा सहभाग, कृषी विद्यापीठांचे संशोधन, शासकीय कृषी योजनांचे स्टॉल, शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, तज्ज्ञांचे व्याख्यान, यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव कथन, महिलांसाठी बचत गट व कृषी आधारित उद्योग यांचा समावेश करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
तसेच शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, माती परीक्षण, पीक सल्ला, हवामान आधारित शेती मार्गदर्शन, कर्ज व विमा योजनांची माहिती देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना केवळ माहितीच नव्हे तर प्रत्यक्ष लाभ मिळेल, याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामुळे आष्टी तालुक्यासह बीड जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची नवी दिशा मिळणार असून, शेती व्यवसाय अधिक शाश्वत व नफ्याचा करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनात राज्यभरातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



stay connected