गुणवत्तेत अग्रेसर राहून विद्यार्थीनी शाळेचा नावलौकिक करावा : मुख्याध्यापक शिवदास शेकडे

 गुणवत्तेत अग्रेसर राहून विद्यार्थीनी शाळेचा नावलौकिक करावा : मुख्याध्यापक शिवदास शेकडे




आष्टी : स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल आणि आई-वडिलांसह गाव व शाळेचे नाव मोठे करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत अग्रेसर राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवदास शेकडे यांनी केले.

भैरवनाथ विद्यालयातून एनएमएमएस (NMMS) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रेणुका मोहन शेकडे आणि आयान शौकत पठाण या दोन विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार नितीन कांबळे, शौकत पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शाळा असूनही शिक्षकांच्या अभ्यासपूर्ण अध्यापनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने वाढत आहे. कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेतही विद्यार्थी चमकू लागले आहेत. भविष्यात हे विद्यार्थी जिल्हा नव्हे तर राज्य पातळीवर जाऊन शाळेचे नाव उज्ज्वल करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी भैरवनाथ विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर तांदळे, सहशिक्षक अशोक तांदळे, बाळासाहेब राजगुरू, किसन शेकडे, कृष्णा शेकडे, प्रवीण तांदळे, दत्ता शिरसाठ, नारायण आंधळे, विश्वनाथ शेकडे, ग्रामपंचायत सदस्य आसमा शौकत पठाण यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी तसेच अरणविहरा, तागडखेल, जोमदार तांडा व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.