परभणीत मुस्लिम शिवसैनिकाला महापौर पद दिल्याने वाद; शिवसेना समर्थकांचा भाजपावर प्रतिप्रश्नांचा भडिमार

 परभणीत मुस्लिम शिवसैनिकाला महापौर पद दिल्याने वाद; शिवसेना समर्थकांचा भाजपावर प्रतिप्रश्नांचा भडिमार




परभणी | प्रतिनिधी

परभणी महानगरपालिकेत शिवसेनेच्या वतीने मुस्लिम शिवसैनिक सय्यद इकबाल यांना महापौर पद देण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही संघटनांकडून या नियुक्तीवर टीका होत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे समर्थक मात्र आक्रमकपणे बचाव करत समाजमाध्यमावर भाजपावर अनेक प्रतिप्रश्न उपस्थित करत आहेत.

शिवसेना समर्थकांचे म्हणणे आहे की, “गेल्या वीस वर्षांपासून हिंदुत्ववादी शिवसेनेत निष्ठेने काम करणाऱ्या एका मराठमोळ्या मुस्लिम कार्यकर्त्याला जबाबदारी देण्यात नेमकं काय चुकलं?”

शिवपुराणासाठी शेत दिलं, तेव्हा आक्षेप नव्हता?

समर्थकांनी आठवण करून दिली की, 2023 साली परभणीमध्ये शिवपुराणासारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी सय्यद इकबाल यांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या मिळून जवळपास 60 एकर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवून जागा उपलब्ध करून दिली होती. त्या वेळी सर्व माध्यमांतून त्यांच्या “मोठ्या मनाचा” गौरव करण्यात आला होता.

“तेव्हा मुस्लिम शेत चाललं, मग आज महापौर पद का खटकतं?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपातील मुस्लिम पदाधिकारी आणि प्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह

या मुद्द्यावर शिवसेना समर्थकांनी भाजपावर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यामध्ये,

परभणी उरूस कमिटीमध्ये भाजप जिल्हाध्यक्षाची भूमिका काय?

पाथरीचे नगराध्यक्ष आसिफ खान हे मुस्लिम नाहीत का?

जिंतूरमध्ये भाजपाने मुस्लिम नगरसेवक निवडून आणले, मग त्यांचा राजीनामा घेणार का?

जिल्हा परिषद गटातून अल्ताफ सय्यद यांना भाजपानेच उमेदवारी दिली होती, मग त्यावर मौन का?

असे प्रतिप्रश्न उपस्थित करण्यात आले.

“राजकारणात धर्म पाहून भूमिका घेणं दुटप्पीपणा”

समर्थकांचे म्हणणे आहे की, भाजप स्वतः अनेक ठिकाणी मुस्लिम नेते, मंत्री, नगरसेवकांना संधी देते, मात्र शिवसेनेने मुस्लिम शिवसैनिकाला पद दिल्यावर टीका करणे हा दुटप्पीपणा आहे.

त्यांनी विधानपरिषद निवडणुकांमध्ये विविध पक्षांच्या मतांचा आधार घेण्यात आला होता, तसेच केंद्रात मुस्लिम मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता, याकडेही लक्ष वेधले.

शिवसेनेचा इतिहास समावेशक असल्याचा दावा

शिवसेनेने कधीही धर्म किंवा समाज पाहून उमेदवारी दिली नाही, असा दावा करत समर्थकांनी सांगितले की,

“जर गणित फक्त धर्माचं असतं, तर अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले नसते. शिवसेना ही हिंदुत्ववादी असली तरी तिचं कार्यकर्तृत्व निष्ठेवर आधारित आहे.”

महापौर नियुक्तीचा निर्णय योग्यच – शिवसैनिकांचा ठाम सूर

या वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना समर्थकांनी स्पष्ट केले की,

“उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्य असून महाराष्ट्रातील शिवसैनिक त्याचे समर्थन करतात.”



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.