एक हृदय घेऊन आले… सहा हृदयांना जीवन देऊन गेले!”
केळ गावचे सुपुत्र कै. बाळनाथ पुंड यांचे निधन; ६ अवयवदानातून सहा जणांना नवे आयुष्य
दौलावडगाव | तेजवार्ता न्यूज
केळ (ता. आष्टी) येथील विद्यमान सरपंच श्री. सचिन सुदाम दळवी यांचे मेव्हणे, सर्वांच्या परिचयातील शांत, संयमी व मनमिळावू व्यक्तिमत्त्व असलेले कै. बाळनाथ कानिफनाथ पुंड (वय ३५) यांचे पुणे येथील रूबी हॉल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुंड परिवारासह नातेवाईक, मित्रपरिवार व संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
“येताना एक हृदय घेऊन आले आणि जाताना हजारो हृदयांत कायमची जागा करून गेले” — अशी भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे. बाळनाथ पुंड यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी असल्याचे सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
दुःखातून उभा राहिला मानवतेचा दीप
या अत्यंत वेदनादायी क्षणीही पुंड परिवाराने आणि सरपंच सचिन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत महान व प्रेरणादायी निर्णय घेतला. कै. बाळनाथ पुंड यांच्या दोन डोळे, दोन किडन्या, यकृत (लिव्हर) व हृदय असे एकूण ६ अवयव दान करून सहा गंभीर रुग्णांना नवे जीवनदान देण्यात आले.
हा अवयवदानाचा निर्णय समाजासाठी आदर्श ठरणारा आणि हजारो लोकांना प्रेरणा देणारा आहे. दु:खावर मात करून मानवतेचा संदेश देणाऱ्या या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अपघातास जबाबदार कोण?
प्राथमिक माहितीनुसार, एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात बाळनाथ पुंड यांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गरजू रुग्णांसाठी आवाहन
सरपंच सचिन दळवी यांनी आवाहन केले आहे की, परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची तातडीची गरज असल्यास त्यांनी रूबी हॉल हॉस्पिटल, पुणे येथे त्वरित संपर्क साधावा.
अंत्यविधी
कै. बाळनाथ पुंड यांचा अंत्यविधी मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता, लिमगाव फाटा, ता. व जि. अहिल्यानगर येथे झाला आहे.


stay connected