महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत ‘डबल वोटिंग’चा गंभीर आरोप
मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ॲड. संभाजी दहातोंडे यांचे निवेदन**
आष्टी (जि. बीड):
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका तसेच अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘डबल वोटिंग’ झाल्याचा गंभीर आरोप ॲड. संभाजी मोहन दहातोंडे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ॲड. संभाजी दहातोंडे हे सालेवडगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील रहिवासी असून, त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आष्टी तालुक्यातील अनेक गावांमधून बस व खासगी ट्रॅव्हल्सद्वारे मतदारांना महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल व अहिल्यानगर येथे नेण्यात आले. या मतदारांनी तेथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हेच मतदार पुन्हा आष्टी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणार असल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून संबंधित मतदारांची नावे दोन ठिकाणच्या मतदार यादीत नोंद असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ॲड. दहातोंडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की,
“ज्या मतदारांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदान केले आहे, त्यांना पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारे आहे.”
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी समिती स्थापन करावी, तसेच मतदार यादीत डबल नावे असलेल्या मतदारांची नावे तत्काळ बाद करावीत, अशी ठोस मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच, या संदर्भातील स्पष्ट आदेश मा. जिल्हाधिकारी बीड व मा. तहसीलदार आष्टी यांना देण्यात यावेत, अशीही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत, आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही ॲड. संभाजी दहातोंडे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
या प्रकरणामुळे मतदार यादीची विश्वासार्हता, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास या मुद्द्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक आयोग या तक्रारीवर काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


stay connected