सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या घरी दिवसा चोरी; कापशी गावात खळबळ
आष्टी (प्रतिनिधी):
देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या घरात दिवसाढवळ्या चोरी झाल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील कापशी येथे घडली आहे. महादेव गोल्हार हे जवान सध्या देशसेवेसाठी सीमेवर कार्यरत असताना, त्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोल्हार कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे दिवसा शेतावर कामासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे, पेटी उघडून त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीनंतर चोरटे पसार झाले.
सायंकाळी शेतावरून घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने कुटुंबीयांना चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर आपले प्राण धोक्यात घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या कुटुंबालाच असुरक्षिततेचा सामना करावा लागणे ही अत्यंत खेदजनक व चिंताजनक बाब आहे. जवान देशासाठी लढत असताना त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी समाज व प्रशासनाची आहे, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर कापशी गावात भीतीचे वातावरण पसरले असून, दिवसा वाढणाऱ्या चोऱ्यांबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना अटक करून चोरीचा उलगडा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





stay connected