कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पाच कोटींचे अंतर्गत रस्ते होणार
----- आ.सुरेश धस
धामणगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पेठेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी सहकारी संस्था असून येथून उत्पादित होणारा कांदा थेट परदेशात निर्यात होतो. कांदा उत्पादनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढली असून तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत कडा बाजार समितीचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
धामणगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती कडा यांच्या उपबाजार पेठेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार धस यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कडा बाजार समिती आवारात पाच कोटी रुपयांचे अंतर्गत सिमेंट रस्ते मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
या उद्घाटन कार्यक्रमास माजी आमदार साहेबराव दरेकर, सभापती रमजान तांबोळी, उपसभापती नामदेव धोंडे, सचिव हनुमंत गळगटे, दूध संघाचे माजी चेअरमन संजय गाढवे, धामणगावच्या सरपंच संजनाताई गाढवे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, एन. टी.गर्जे,संजय गाढवे,सरपंच मनोज गाढवे,चेअरमन वशांतीलाल भोसले, अशोक गर्जे, सभापती बद्रीनाथ जगताप,मा. सभापती शत्रुघन मरकड, संदीप खकाळ, शाम तळेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
धामणगाव येथे उपबाजार पेठ सुरू व्हावी, ही मागणी गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित होती. आमदार सुरेश धस व बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नातून हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार धस पुढे म्हणाले की, धामणगाव येथे उपबाजार पेठ सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. आष्टी तालुका कांदा उत्पादक म्हणून ओळखला जातो. पूर्वी येथील कांदा अहिल्यानगरला पाठवावा लागत होता; मात्र आता स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने वाहतुकीचा खर्च वाचून शेतकऱ्यांना अधिक दर मिळत आहे. धामणगाव परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
या उपबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशांत गोडसे यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, सध्या २४ मोठे व ६ लहान प्लॉट असलेली जागा बाजार समितीने भाडेतत्त्वावर घेतली असून भविष्यात स्वतःची जागा खरेदी करून विस्तारित बाजार समिती उभारण्याचा मानस आहे.
धामणगाव ते हातोला फाटा रस्त्याचे काम तात्काळ सुरू होणार असून म्हसोबावाडी ते धामणगाव हा २८ किलोमीटरचा डांबरी रस्ता एका महिन्यात पूर्ण केला जाणार आहे. तसेच बोरडवाडी ते जाट देवळा रस्त्याचे काम मंजूर झाले असून तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची पत वाढली तरच देशाची प्रगती होईल, असे सांगून आमदार धस यांनी कांदा लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य बियाणे, खते व औषधांचा वापर करण्याचे आवाहन केले. बाजार समितीच्या संचालकांनी गावनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच विजेच्या समस्येवर उपाय म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी सांगितले की, धामणगाव परिसरात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर असून आता नगर–पुण्याकडे जाणारा कांदा धामणगाव बाजारपेठेत येणार आहे. बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात सभापती रमजान तांबोळी यांनी सांगितले की, आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून धामणगाव उपबाजारासाठी जागा उपलब्ध झाली असून अकरा वर्षांचा करार करण्यात आला आहे. भविष्यात कडा व धामणगाव येथे बाजार समितीची स्वतःची जागा घेऊन व्यापार वाढविण्यात येणार आहे.
कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. अकील सय्यद, कल्याण काकडे, राम शेळके, गौतम आजबे, दत्ता चव्हाण, लक्ष्मण नन्नवरे, सागर आमले, बाळासाहेब निकम, बुवासाहेब शेकडे, आत्माराम फुंदे, रावसाहेब लोखंडे, अंकुश चव्हाण, अशोक ढवन, बबलू तांबोळी, बाबा चांगण,हमीदभाई, समद शेख, पिंटू शेठ भोगावत, प्रशांत गोडसे, सुंदर गर्जे, सहाय्यक निबंधक दीपक पवळ, तुकाराम ढोबळे, राजू खलाटे, बाळासाहेब ढोबळे, प्रल्हाद मुळे, मोहन आमटे, दत्तात्रय खोटे, बंडू तळेकर, संजय महाजन, खंडू हाके, विकास पवार, विजय चितळे, नंदकिशोर करांडे, ज्योतिबा महाडिक, उद्धव पवार, संतोष मोरे, अशोक इथापे, राजू झुंजुर्के, शिवलाल कासवा, राम मधुरकर, संजय ढोबळे, मधुकर सायंबर, अशोक पवार, मुरलीधर फसले, अशोक लगड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन अनिल ढोबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव हनुमंत गळगटे यांनी मानले.





stay connected