मल्हार गडावर 'दीपावली सांस्कृतिक फराळ कार्यक्रमात' रंगला बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथन कार्यक्रम Dipawali Sanskrutik Faral

 *!! मल्हार गडावर 'दीपावली सांस्कृतिक फराळ कार्यक्रमात' रंगला बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथन कार्यक्रम !!*




अहिल्यानगर :-त्रिपुर पौर्णिमेनिमित्त.. मॉडर्न कॉलनी, गुलमोहर रोड तर्फे, मल्हार गडावर 'दीपावली सांस्कृतिक फराळ कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता. ही अभिनव कल्पना मॉडर्न कॉलनीतील श्री सुनील गायकवाड आणि दिलीप कुलकर्णी यांनी आखली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रशांत यवतकर हे होते.

या कार्यक्रमांतर्गत कथालेखक बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन संपन्न झाले. त्यामध्ये त्यांनी 'भाव भक्तीचा तो भुकेला' .. हा प्रयोग सादर केला. संसारात,प्रपंच करता करता, वासंती आपला 'गुरुमंत्र' सदोदित ओठांमध्ये म्हणत राहते. आज परमात्मा पांडुरंगाची , पंढरपूर कडे जाणारी दिंडी आपल्या घरी येणार. याचे तिला अप्रूप होते. घरी येणाऱ्या संतांच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तिने जय्यत तयारी केलेली. ऐनवेळी तिने केलेला चिवडा तिच्या जाऊबाईने नाकारला.ती नाराज झाली. तेव्हा तिला सासूबाईची आठवण झाली. अठरा पुराणे आणि शेकडो पोथ्या श्रवण केलेली ती सासू, तिला म्हणत असे..'अगं देवाला आपलेसे करण्यासाठी दोन्ही हाताचा नमस्कार आणि दोन फुले मनोभावे वाहिली ,की ती देवाला पावतात. माणसाची श्रद्धा डोळस असायला हवी. बेगडी, नकली श्रद्धा उपयोगाची नाही.' दिंडीचे रिंगण ,पाद्यपूजा, नमस्कार ,फराळ ,चहापाणी सारे काही व्यवस्थित झाले. दिंडी येऊन गेल्यानंतर उशिराने एका  सावळ्या, वयस्कर वारकऱ्यांच्या रूपात, वारकरी येतो फराळ, चहापाणी करतो आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, 'तुळशीची नवी माळ' प्रसाद म्हणून ठेवून जातो.. मनात श्रद्धा असेल तर अनुभूती कशी मिळते? याचे सादरीकरण देशमुखांनी खूप छान प्रकारे केले. अन् मल्हार गडावर भक्तीचा भाव जागवला. 

या कार्यक्रमात मनीष शेळके, गोवर्धन बेरड, डॉक्टर प्रशांत यवतकर, सुनील गायकवाड यांनी हिंदी, मराठी अविट गाणी म्हणून कार्यक्रमाची रंगत वाढवली. श्री दिलीप कुलकर्णी यांनी विडंबन गीत सादर करत, मल्हार गडावर टाळ्यांचा पाऊस पाडला.

मॉडर्न कॉलनी तर्फे सखाराम कवडे, मुकुंद शेठ, किशोर लाटे, अमोल भिसे या मान्यवरांच्या हस्ते अन्नदाना करता रोख रक्कम , मंदिरातील विश्वस्तांकडे देण्यात आली.

हरिभाऊ देशपांडे यांनी आभार प्रदर्शन  केले. या कार्यक्रमात कॉलनी रहिवासी सह, गडावर आलेले भाविक भक्तगण देखील सहभागी झाले होते.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.