कडा महेश साखर कारखान्यात भ्रष्टाचाराचा गुंता; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी
***********************
३१ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आष्टी तालुका साखर कामगार युनियनचे धरणे आंदोलन
**************************
आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना ठप्प ठेवून शेतकरी व कामगारांची दिशाभूल करणाऱ्या कडा (महेश) सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर कठोर कारवाई करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी आष्टी तालुका साखर कामगार युनियनने निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीसाठी युनियनतर्फे ३१ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आष्टी तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
युनियनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, महेश मल्टीस्टेट को-ऑप बँकेने कारखान्याच्या ७/१२ उताऱ्यावर टाकलेला बोजा बेकायदेशीर असून, कारखान्याची मालमत्ता बेकायदेशीररीत्या स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे कारखाना वाचवण्यासाठी तातडीने बोजा कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय थकीत पगार, ग्रॅच्युटी मिळावी, तसेच औद्योगिक न्यायालय औरंगाबाद, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, आर.जी.डी. औरंगाबाद, विशेष लेखा परीक्षक बीड आणि तहसीलदार आष्टी यांच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या बारा वर्षांपासून संचालक मंडळाने लेखा परीक्षण अहवाल, दोषदुरुस्ती अहवाल व वार्षिक सभा इतिवृत्त सादर केले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच
कलम ८८ अंतर्गत असलेली कार्यवाही व हायकोर्टाची स्थगिती उठवून मंडळावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर अध्यक्ष आनंदराव वायकर,कार्याध्यक्ष बी.एन. झांजे, उपाध्यक्ष डी.व्ही.धुमाळ, सचिव एन.ए. साबळे, सदस्य सय्यद इस्माईल महमंद व एन.डी.कर्डीले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

stay connected