Bjp RSS हिंदुत्वाचे सोंग अन देशभक्तीचे ढोंग करू नका-उद्धव ठाकरे

 


Bjp RSS हिंदुत्वाचे सोंग अन देशभक्तीचे ढोंग करू नका-उद्धव ठाकरे



मुंबई (प्रतिनिधी) शिवसेनाच्या (ठाकरे) मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लावा, असे आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले आहे. मुंबईमध्ये खान महापौर होईल अशी टीका भाजप नेत्यांकडून केली जात आहे, त्यांच्या या टीकेला ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन अंगावर येऊ नका, तुमच्या सर्व टोप्या उडवल्याशिवाय राहाणार नाही, असे ते म्हणाले.

हिंदुत्वाववरुन आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा तुमच्या टोप्या उडवल्या शिवाय राहाणार नाही. हिंदूत्वाचे सोंग आणि देशभक्तीचे ढोंग आता करु नका. महाराष्ट्रात गोमाता आणि तिकडे जाऊन खाता, असे तुमचे हिंदुत्व आहे.तुम्हाला संधी मिळाली आहे त्याचा चिखल करु नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे भर पावसात झालेल्या दसरा मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाला दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक लावाच,असे देखील ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन जातात आणि भाजपचाच महापौर होईल असे बोंबलून जातात. आता निवडणुका आल्या आहेत तेव्हा भाजपवाल्यांनी हिंदू-मुस्लिम करायला सुरुवात केली आहे. आमच्या मेळाव्यालाही मुसलमान आले असतील. येऊ द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, या देशात कोणाचाही कोणताही धर्म असू शकतो. मात्र राष्ट्रधर्म एकच असला पाहिजे तो म्हणजे हिंदूस्थान, हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेले आहे, असे म्हणत हिंदूत्वावरुन भाजपवर हल्लाबोल केला.

जनता निवडणुकीची वाट पाहात आहे. भाजप नेते म्हणत आहे की, शिवसेनेची (ठाकरे) सत्ता आली तर मुंबईचा महापौर खान होईल. एकदा निवडणूक लावाच असे आव्हान भाजपला देत उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबईमधले सर्व रस्ते खराब करुन टाकले आहेत. मेट्रो आणि मनो रेल लटकलेल्या आहेत. आता मुंबईमध्ये बोटसेवा सुरु करा,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला.

भाजप नेत्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही शेंडी, जाणवं घालाल आणि अदाणीला मुंबई समर्पीत करुन टाकाल. तुम्ही व्यापारी म्हणून मुंबईकडे बघत आहात, पण आम्ही आमचा जीव म्हणून मुबंईकडे बघत आहोत. तुम्ही मुंबई जिंकूच शकत नाही, पण जर भाजपने मुंबई जिंकली तर ते अदाणीला समर्पित करुन टाकतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

भाजप नेते आम्हाला हिंदूत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमच्या फडक्यावरील हिरवा रंग आधी काढून टाका आणि मग आमच्यासोबत हिंदुत्वाच्या गप्पा करा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना उद्देशून म्हटले की तुमच्या चेल्या चपाट्यांना आवारा. ही संघाच्या झाडाला आलेली विषारी फळं आहेत, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मोहन भागवतांना संघाला शंभर वर्ष झाल्यानंतरही समाधान आहे का? तुम्ही शंभर वर्ष मेहनत केली. त्यानंतर संघाच्या झाडाला ही विषारी फळं आली आहेत. याचसाठी तुम्ही मेहनत घेतली होती का, असा सवाल ठाकरे यांनी भागवतांना केला.



मोहन भागवत यांना आता सांगता येत नसेल, मात्र त्यांना नक्की वाटत असणार की आरएसएसचा हेतू ब्रम्हदेवाचा बाप होण्याचा होता. मात्र ब्रम्हदेव तर झाला नाही पण ब्रम्हराक्षास झाला आहे, असा टोला त्यांनी संघ आणि भाजपला लगावला.

संघाचे प्रमुख मोहन भागवत हे गेल्या तीन वर्षांपासून मदरशांचे दौरे करत आहेत. मुस्लिम मौलवी आणि नेत्यांना भेटत आहेत. त्यांनी हिंदूत्व सोडले आहे का, असा प्रश्न विचारण्याची भाजपच्या नेत्यांमध्ये हिम्मत आहे का, असा पलटवार ठाकरेंनी केला.

कर्नल सोफिया कुरेशी यांना भाजपचे लोक पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची बहीण म्हणाले होते. त्या सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहिण आहे, हे आमचे हिंदूत्व आहे. हिंदुत्व कशाला म्हणायचे आणि कोणाला विरोध करायचा हे एकदा भाजपने ठरवले पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांचा एकीकडे भाजपवाले सत्कार करतात आणि दुसरीकडे मोदी सांगतात की मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्या. अमित शहा सांगतात की पहलगामध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या आणि त्यांचाच पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय. हे तुमचं हिंदुत्व आहे का?



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.