कड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातच 'घाणीचे साम्राज्य'
गावाला स्वच्छतेचा संदेश देणारे लक्ष देईल काय?
-------------------
राजेंद्र जैन / कडा
--------------------
येथील धामणगाव रोडलगत कडा शहराच्या मुख्य प्रवेशद्वारातच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांना 'स्वच्छते'चा संदेश देणारी ग्रामपंचायत या 'अस्वच्छते'कडे लक्ष देईल काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धामणगाव रोडलगत असलेल्या शहराच्या मुख्य प्रवेशद्वारातच कचऱ्याचे ढीग साचून घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नाकाला रुमाल लावूनच शहरात प्रवेश करावा लागत आहे. तर दुसरीकडे घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. सांडपाणी आणि कचऱ्याचे ढीग यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर नवल वाटू नये. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाने या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा. अशी मागणी होत आहे.
-------%%------
stay connected