*माजी सैनिक कुशल महादेव घुले यांचा प्रेरणादायी उपक्रम — अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीत एका महिन्याची पेन्शन अर्पण*
तेजवार्ता न्युज दौलावडगाव ...
आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यात सेवा बजावलेले माजी सैनिक श्री. कुशल महादेव घुले यांनी पुन्हा एकदा देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. अलीकडील दिवसांत महाराष्ट्रभर पडलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील हजारो शेतकरी बांधवांचे पिक, घर, जनावरे आणि उपजीविकेची साधने उद्ध्वस्त झाली आहेत. या संकट काळात शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत, श्री. घुले यांनी आपली एक महिन्याची संपूर्ण पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीस जमा केली आहे.
या भावनिक आणि प्रेरणादायी कृतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. श्री. घुले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या कठीण काळात त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे. म्हणूनच मी माझी एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीत अर्पण केली आहे. शेतकरी राजा सुखी असेल तरच आपले जीवन सुखी राहील.
आपणही आपल्या परीने थोडेफार योगदान द्यावे. कारण शेतकऱ्यांचे हे संकट केवळ त्यांचे नसून, संपूर्ण समाजाचे आहे. चला, आपण सर्व मिळून त्यांच्या मनोबलाला बळ देऊया.
या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव होऊन ते देखील या मोहिमेत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
stay connected