*रीडिंगवाल्याची कमाल – महावितरणची धमाल, आगाऊ बिलाने ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास*
कासम शेख दौलावडगाव -
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव अंतर्गत सर्व गावांमध्ये महावितरणकडून नागरिकांना मिळणाऱ्या चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत. रेडिंग वाल्यांच्या हलगर्जीपणामुळे वीज वापराच्या तुलनेत जास्त बिल आकारले जात असून त्यात आगाऊ रकमेचाही समावेश केला जात आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
ग्राहकांचे म्हणणे आहे की, “मीटरची योग्य तपासणी न करता अंदाजे आकडे लिहून बिल काढले जाते. खरे तर वापर कमी असूनही दुप्पट-तिप्पट रक्कम आकारली जाते. त्यामुळे रोजच्या खर्चात मोठा बोजा बसतो.”
स्थानिक नागरिकांनी महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे लेखी व तोंडी तक्रारी सादर केल्या आहेत. तातडीने चुकीची बिले दुरुस्त करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकारामुळे ग्राहकांची महावितरणच्या दारी पायपीट होत असून यामुळे ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
stay connected