कव्हळे कुटूंबाच्या दोन्ही कन्यांचे स्वप्न झाले साकार – कव्हळे कुटुंबातील दुहेरी आनंद ! समाजासाठी प्रेरणादायी कार्य !
आष्टी : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक सारख्या छोट्याशा खेड्यातील कव्हळे कुटुंब आज आनंदाच्या शिखरावर आहे. ज्याठिकाणी जन्मतःच अठरा विश्व दारिद्र्याशी सामना करत जगावं लागतं, ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमधील हे कुटुंब आज संपूर्ण समाजाला प्रेरणा देत आहे.
या कुटुंबाचे कर्तृत्ववान आधारस्तंभ भाऊसाहेब शांताराम कव्हळे यांनी स्वतः गरिबीतून शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचे ऋण फेडले. त्यानंतर महसूल विभागात सेवा करताना त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष केला. त्या संघर्षाचे गोड फळ आज दुहेरी स्वरूपात मिळाले आहे.
चार वर्षांपूर्वी मोठी कन्या प्रीती कव्हळे हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी झाली होती. तेव्हा धाकटी प्रेरणा हिने डोळे मिटून एकच शपथ घेतली होती – “मीही डॉक्टर होणारच!” आज त्या जिद्दीला यश आले आहे. प्रेरणा कव्हळे हिचीही निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे MBBS साठी झाली आहे.
आज भाऊसाहेब कव्हळे व त्यांच्या कुटूंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एकेकाळी हातात रायफल घेऊन देशरक्षण करणारे भाऊसाहेब आता मुलींच्या हातात स्टेथोस्कोप पाहून अभिमानाने नतमस्तक झाले आहेत. देशसेवा, जनसेवा झाल्यानंतर आता कव्हळे कुटुंबीयांच्या मुली आरोग्य सेवेचे व्रत पाळणार आहेत.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या राष्ट्रीय घोषणेचं जिवंत उदाहरण म्हणजे हे कव्हळे कुटुंब! रुग्णसेवेचे स्वप्न उराशी बाळगून दोन्ही कन्या MBBS करत आहेत . ज्यांच्या स्वप्नात जिद्द असते ते यशाची शिखरे काबीज करतातच !
कारखेल बुद्रुकसारख्या छोट्याशा खेड्याने दोन MBBS कन्या घडवल्या आहेत – ही केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याची शान ठरली आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .


stay connected