दुसरे मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन, भावठाणा
२३ व २४ ऑगस्ट २०२५
संमेलनाध्यक्ष श्री. उमेश मोहिते यांचे भाषण
सर्वांना प्रथम मनःपूर्वक नमस्कार !
अंबाजोगाई मसाप शाखेच्या वतीने भावठाणा येथे आज संपन्न होत असलेल्या दुसऱ्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उद²घाटक म्हणून उपस्थित असलेले मा.डॉ. नरेंद्र काळे, या संमेलनाची स्वागताध्यक्ष म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळणारे ‘मानवलोक'चे मा. अनिकेत लोहिया, मसाप शाखेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा घाटनांदूर येथे संपन्न झालेल्या पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. अमर हबीब, लेखक मित्र मा. दगडू लोमटे, मा. प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, मा.डॉ. नरेंद्र काळे, अंबाजोगाई मराठवाडा साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष मा.डॉ. राहूल धाकडे, उपाध्यक्ष प्रा.डॉ. शैलजा बरूरे, कार्यवाह मा. गोरख शेंद्रे, कोषाध्यक्ष मा.मंजुषा कुलकर्णी, मसाप शाखेचे इतर सदस्य, संमेलनाच्या स्वागत समितीचे सर्व सभासद, निसर्ग सौंदर्याने संपन्न अशा भावठाणा गावचे सरपंच मा. रुि‘णबाई गंगाभिषण पारिख, उपसरपंच मा. हनुमंत राठोड, ‘मानवलोक'चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. संजय पालकर सर व त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार बांधव, उपस्थित कवी, लेखक आणि सर्व गावकरी रसिक बंधू-भगिनींनो, आजचा हा दिवस माझ्यासाठी खूपच आनंदाचा आहे कारण आज मी आपणा सर्वांच्या साक्षीने दुसऱ्या मृदगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवत आहे. दोन वर्षांपूर्वी घाटनांदूर येथे पहिल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मा.अमर हबीब यांनी भूषवले होते आणि आता तोच सन्मान मला मिळाला आहे. अर्थातच त्यांनीच या दुसऱ्या संमेलनाध्यक्षपदी माझ्या नांवाची शिफारस करुन मला हा मोठा बहूमान दिला आहे. त्यास्तव मी अमर हबीब आणि मसापचे सर्व पदाधिकारी यांनी दिलेल्या या बहुमानाचा विनम्रतेने स्वीकार करतो आणि त्यांचे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.
अर्थात हा मोठाच बहूमान तुम्ही मला दिला आहे. तो मी माय-मराठीत केलेल्या थोड्या-बहुत लेखनासाठी आणि तुमच्या मजवरील प्रेमापोटी, या गोष्टीची मला नम्र जाणीव आहे. खरं तर लेखनाची वा वाचनाची कसलीच परंपरा आमच्या घरात नव्हती. मी मूळ अंबाजोगाईचा रहिवाशी. घरी-दारी कुणबीकीचे वातावरण. आई-वडील ऊन-पावसात राबत. परंतु मी एवढा भाग्यवान की, अंबानगरीत मी जन्माला आलो. मी असे म्हणतो कारण तेव्हाही जवळपास सारेच आवश्यक ते शिक्षण अंबानगरीत मोफत उपलब्ध होते आणि म्हणूनच मी शिकू शकलो. असो. मला वाटते, माझी शैक्षणिक पार्श्वभूमी थोडी विस्ताराने सांगणे इष्ट ठरेल; त्याचं कारणही तसेच आहे; कारण त्या काळी माझ्या आयुष्यात एक घटना घडून गेली आणि माझ्या पुढील आयुष्याला अगदी अनपेक्षितपणे सुखकारक अशी कलाटणी मिळाली. त्या घटनेमुळे मी पुस्तकांचा कायमचा निकटवर्ती झालो.
साहित्य संमेलनातून कलाटणी: -
सन 1983 ला अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी महाविद्यालयात 57 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कै.व्यंकटेश माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. तेव्हा मी नुकतेच परळी येथून आय.टी.आय. इले³ट्रीशियनचा ट्रेड उत्तीर्ण होऊन नोकरीच्या कॉलची वाट बघत होतो आणि सोबतच एका मित्राच्या दुकानी इलेि³ट्रकल कामही करीत होतो. तसा मी मोकळाच होतो म्हणून मग मोठ्या अपूर्वाईने मी या साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. या संमेलनाचे अध्यक्ष कै.व्यंकटेश माडगूळकर, कै.वा.कृ.चोरघडे, कै. रवींद्र पिंगे, कै.शंकर पाटील, कै.सुरेश भट, कै.वसंत सबनीस, कै.गंगाधर गाडगीळ, कै.शांताबाई शेळके असे कितीतरी अभ्यासक्रमातले कवी-लेखक मला तेंव्हा जवळून बघायला मिळाले. त्या आधी लेखक म्हणून फक्त प्राचार्य रा.रं.बोराडे यांनाच पाहिलेला मी ही वाङ²मयोपासकांची इतकी सारी मांदियाळी बघून भान हरवूनच गेलो. तसेच ग्रंथ प्रदर्शनातील विविध विषयांवरील सारी पुस्तके पाहूनही मी थक्कच झालो. तेव्हा जवळ काही पैसे होते म्हणून संमेलनाध्यक्ष कै.माडगुळकरांचे ‘माणदेशी माणसं' हा व्यक्तिचित्रणपर कथांचा संग्रह विकत घेतला आणि माझ्या वाचनाचा श्रीगणेशा झाला. मग मी मंडीबाजारातील साहित्य निकेतन ग्रंथालयाचा मासिक वर्गणीदार झालो आणि झपाटल्यासारखा वाचन करीत सुटलो. आधी मी साहित्य संमेलनाध्यक्ष कै.व्यंकटेश माडगुळकरांची सारी पुस्तके वाचून काढली आणि उत्तरोतर माझी वाचनाची गोडी अधिकच वाढत गेली. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, डॉ.आनंद यादव, शंकरराव खरात, महादेव मोरे, उध्दव ज.शेळके, चारुता सागर, बाबुराव बागूल, द.मा.मिरासदार असे करीत करीत माझी वाचनाची गाडी प्राचार्य रा.रं.बोराडे यांच्यापर्यंत आली आणि मी त्यांच्या कथेने अगदी झपाटून गेलो. त्यांच्या लेखन-शैलीचा एवढा प्रचंड प्रभाव माझ्यावर पडला की, मी त्यांच्या लेखणीच्या प्रेमातच पडलो. मग त्यांची ‘पाचोळा', ‘मळणी'पासून मिळतील तितकी सारी पुस्तके मी वाचून काढली आणि त्यांच्या लिखाणातली माणसं नित्य परिचयाची नि भवतीची वाटू लागली आणि माझ्या मनात लेखनाची उर्मी दाटून आली.
कथेने लेखनास प्रारंभ: -
याचाच परिणाम असा झाला की मी कथा लेखनास सुरुवात केली आणि माझ्या भोवतालच्या निरक्षर व कष्टकरी माणसांची सुख-दुःखे, त्यांचे हर्ष-विमर्ष, राग-लोभ, त्यांचे भीषण दारिद्रय नि कष्टमय जगणे, त्यांच्यात प्रचलित असलेल्या समजूती नि अंधश्रध्दा आणि त्यांचे नात्या-गोत्याचे ताण-तणाव इ. कथेतून मी शब्दबद्ध करु लागलो. नंतर विविध कथास्पर्धांमध्ये माझ्या पंधरा कथांना बक्षीसे मिळाली आणि माझा लेखनाचा हुरुप वाढत गेला. कॉलेज शिकण्याची इच्छा माझ्या मनात बळावत गेली आणि कॉलेजमधून वाचण्यासाठी कथा-कादंबरीची पुस्तके मिळतात, असे समजताच काहीही विचार न करता मी अकरावीला कला शाखेत प्रवेश घेतला. याच काळात पुढे समानधर्मी लेखक मित्र मिळत गेले. अशोक मस्के, कै.अनंत लोकरे, दासू वैद्य, विलास इंगळे, बलराज संघई, सुधीर धावडकर, ओमप्रकाश तिडके, शंतनू हिरळकर, विलास पाटील असं लेखन करणाऱ्या आम्हा मित्रांचा ग्रूप तयार झाला. मंडी बाजारातील साहित्य निकेतन ग्रंथालय आमचे वाङ²मयीन भरण-पोषणाचे केंद्र बनले आणि ते ग्रंथालय आमचे एकत्र येण्याचे हक्काचे ठिकाणही झाले. आमच्या आपसात साहित्यविषयक चर्चा झडू लागल्या. परस्परांच्या छापून आलेल्या लेखनावर आम्ही चर्चा करु लागलो. कोणाचं काही छापून आले तर चहा-पाणीही होऊ लागले. असा तो नव्वदच्या दशकाचा भारावलेला काळ होता. यातच प्रा. रा.द. अरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक मस्केच्या नेतृत्त्वाखाली आम्ही मसाप शाखेचे पुनरुज्जीवन केले आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. मित्र अशोक मस्के नंतर कार्यवाहपदाची जबाबदारी मी सन 1991 पर्यंत पार पाडली. तोपर्यंत माझ्या जवळपास पस्तीस कथा विविध मासिकं नि दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाल्या असल्याने मी माझ्या सतरा निवडक लघुकथांचा समावेश असलेल्या ‘जागरण' या कथासंग्रहाचे हस्तलिखित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे अनुदानासाठी पाठवून दिले. त्याच वर्षी इंग्रजीचा शिक्षक म्हणून माजलगावला मला नोकरी लागली. थोड³यात केवळ पुस्तकांच्या मैत्रीमुळे हाती ‘टेस्टर' घेऊन लाईनमन होण्याऐवजी मी हाती ‘पुस्तक' घेऊन वाङ²मयाचा उपासक झालो आणि सन 1991 ला ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी माझी जन्मभूमी अंबानगरी मी सोडली. असो. मघाशी मी लाईनमन आणि शिक्षक या दोन क्षेत्रांची तुलना केली ती अमूक क्षेत्र हलक्या दर्जाचे वा तमूक क्षेत्र उच्च दर्जाचे असे दर्शवण्यासाठी नसून केवळ पुस्तक वाचनाच्या गोडीमुळे शिक्षक म्हणून माझे आयुष्य कसे आनंददायी नि समाधानी झाले, हे अधोरेखित करण्यासाठी होती, हे मी प्रांजळपणे नमूद करतो.
यथावकाश माझ्या ‘जागरण' या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले आणि ठाणे येथील नयना प्रकाशनातर्फे माझा कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहाला ग्रामीण साहित्यात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा कोपरगाव (जि.अहिल्यानगर) येथील कै. भि.ग. रोहमारे उत्कृष्ट वाङ²मय पुरस्कार मिळाला.याचाच परिणाम म्हणजे नंतर डॉ. आनंद यादव, प्राचार्य रा.रं.बोराडे आणि डॉ. द.ता. भोसले यांची वाहवा मला मिळाली आणि मी लिहिता झालो. असो.
साहित्याचे बीजारोपण:
निसर्ग सौंदर्याने संपन्न अशा बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये वाण नदीकाठी वसलेल्या भावठाणा या गावात हे ‘दुसरे मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन' आज भरले असून या परिसरावर या गावचे जागृत देवस्थान असलेल्या भावेश्वर शंभू-महादेवाचे कृपा छत्र आहे. येथे विविध जाती-धर्मांची माणसे; अभावग्रस्त स्थिती असूनही पिढ्यान² पिढ्या गुण्या-गोविंदाने राहत आली आहेत. मुख्यतः शेती किंवा तिच्याशी पूरक दुधासारखा एखादा प्रमुख व्यवसाय असलेले हे देखणे गाव आहे. येथील लोकांना साहित्य वा वाड²मय म्हणजे काय असते, ते सांगून त्यांच्या अंगभूत कला-गुणांना प्रोत्साहन द्यावे आणि सोबतच इथल्या मातीत लेखन-वाचनाचे बीजारोपण व्हावे, अशा प्रांजळ हेतूने संयोजकांनी भावठाणा गावाची निवड केली असेल, असे मी मानतो. जर वाचन-लेखनाचे बीज या मातीत अंकुरले तर उद्याचा एखादा मोठा कवी किंवा लेखक या भावठाण्याच्या मातीतला असेल, हे कोणीही नाकारु शकत नाही. हा कवी किंवा लेखक इथल्या कष्टकरी माणसांच्या सुख-दुःखाशी समरस होऊन इथले जीवन वास्तव शब्दबद्ध करेल; त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडेल आणि जर इथे कसला अन्याय, अत्याचार किंवा शोषण होत असेल तर त्यांविरुद्ध खंबीरपणे उभा राहण्याची प्रेरणाही देईल, हे नक्की! थोड³यात तो सर्वांच्या भल्यासाठी ‘जागल्या' होऊन माणूसकीचा जागर घालेल. हे जे काही मी वर्तवतो आहे ते उद्या श³य होणार आहे कारण हा परिसर मराठी भाषेचे आद्यकवी ‘विवेक सिंधू' ग्रंथाचे कर्ते मुकुंदराज स्वामी आणि ‘पासोडी' व ‘गीतार्णव' लिहिणाऱ्या दासोपंत स्वामींच्या लेखन कर्तृत्वाने पावन झालेला आहे. अलिकडच्या काळात प्रा. रा.द. अरगडे, डॉ.हरिहर मातेकर, प्राचार्य रंगनाथ तिवारी, प्रा. शैलाभाभी लोहिया, प्रा. प.श्री. संभूस, डॉ. संतोष मुळावकर, प्रा.अरुण नायगावकर, बलभीम तरकसे, अमर हबीब, गणपत व्यास, उमेश मोहिते, बालाजी सुतार, प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे, गोरख शेंद्रे, प्रा.डॉ. सतीश घाडगे, प्रा. देविदास खोडेवाड, प्रा. गौतम गायकवाड, ओमप्रकाश तिडके, अमृत महाजन, सागर कुलकर्णी, बलराज संघई, राजेश रेवले, प्रा.शैलजा बरुरे, श्रीमती संध्या सोळंके आणि श्रीमती सुजाता भोजने अशी मोठी परंपरा या पंचक्रोशीला लाभलेली आहे.
लेखक व समाजाची जबाबदरी:-
समाजाचे खरेखुरे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते; उमटावे लागते. त्यासाठी लेखकाने उघड्या डोळ्यांनी आपला भवताल नीट तपासून बघितला पाहिजे आणि समाजाला दिशा दिग्दर्शन केले पाहिजे; कारण लेखकाला उद्याचे कळत असते; म्हणजेच तो भविष्याचा वेध घेत असतो. आजची परिस्थिती तर खूपच शोचनीय झाली असून इतकी वाईट परिस्थिती मागे भूतकाळात कधी झाली असेल असे वाटत नाही. आज नीतीमत्तेचे धिंडवडे निघाले आहेत. अनाचाराचा अगदी ऊत आला आहे. भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. खून, बलात्कार, आणि मारामाऱ्या या तर नित्याच्या बाबी झालेल्या आहेत. लोकांना कायद्याची कसली भीतीच आता राहिलेली नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राची आज काय दुरवस्था झाली आहे, तेही आपण बघत आहोत. सर्वांना मोफत शिक्षण ही संकल्पनाच आज हद्दपार झाली आहे. आता शिक्षकाची नोकरी जरी मिळवायची असेल तर काही लाख रुपये संस्था चालकाकडे आधी मोजावे लागतात. नोकरी मिळाल्यानंतर त्या बिचाऱ्याला उद्दाम संस्था चालकांची गुलामी सहन करीत जगावे लागते. तसेच आज व्यावसायिक शिक्षणाचे लाखापेक्षा अधिक शुल्क द्यावे लागते. आज कुणाचा कुणाला कसलाच धरबंध राहिलेला नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण खेड्या-पाड्यातही मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. इंग्रजी भाषा ही अभ्युदयाची जननी आहे, अशी सर्व सामान्य जनांची चुकीची धारणा झाल्यामुळे ‘मातृभाषेतून शिक्षण' हा विचारच आता लोकांच्या मनातून नाहीसा झाला आहे. याचा परिणाम म्हणजे मराठी माध्यमाच्या कितीतरी शाळा आज ओस पडत आहेत आणि शासनही या मराठी शाळा बंद करण्यासाठी टपूनच बसले आहे. या परिस्थितीचे एकूणच दुष्परिणाम आता आपणास दिसू लागले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांतली मुले ‘यस- नो'च्या नादात आज मातृभाषा मराठीला पारखे होत आहेत. ते केवळ भाषेलाच पारखे होत चालली नाहीत ; तर आपल्या मराठी संस्कृतीलाही पारखे होत आहेत. आज त्यांना धड मराठीही येत नाही नि धड इंग्रजीही येत नाही, अशी स्थिती आहे. थोड³यात त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का' अशी होत चालली आहे. याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. खरे तर प्रत्येक मुलास त्याच्या मातृभाषेतूनच किमान इयत्ता 5 वी पर्यंतचे तरी शिक्षण दिले गेले पाहिजे, असे बालमानसशास्त्र सांगते; कारण सर्व संज्ञा आणि संकल्पना आपल्या स्वतःच्या मातृभाषेतून जित³या अधिक लवकर कळतात किंवा स्पष्ट होतात, तित³या लवकर नि अधिक प्रमाणात इतर कोणत्याही भाषेतून कळत किंवा स्पष्ट होत नाहीत, हे वास्तव आहे आणि हे वास्तव कोणीच नाकारु शकत नाही; पण आपण वास्तवाकडेच डोळेझाक करीत आहोत. त्यासाठी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विरोधात समाजातूनच आता सक्त विरोध झाला पाहिजे आणि आपल्या माय-मराठीवरचे हे अनिष्टकारी आक्रमण आपण परतवून लावले पाहिजे आणि हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे समजून आपण सर्वांनी यासाठी आता सक्रिय व्हावे लागेल. तसेच लेखकाने स्वतःच्या ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना थेट भिडले पाहिजे आणि त्याने हे प्रश्न किंवा समस्या केवळ आपल्या लिखाणातून न मांडता त्यावरील उपायही त्याला सुचवावा लागेल. त्याने ‘पाणी अडवा,पाणी जिरवा' अभियानाचे महत्त्व पटवून देऊन सक्रिय झाले पाहिजे. समूह शेतीचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी त्याने स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. आजची एक अतिगंभीर समस्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागचे ‘नापिकी' हे एक कारण असल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल, याचे प्रबोधन ग्रामीण भागात घडवून आणले गेले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ‘ग्रामगीता' गावात पठण केली पाहिजे. संत गाडगेबाबांच्या सुधारणा विषयक विचारांचा जागरही मांडला पाहिजे. तसेच शेतीवरील भार कमी झाला पाहिजे; म्हणजेच बिनभरवश्याच्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या आता कमी झाली पाहिजे. थोड³यात ग्रामीण भागातल्या तरुणांनी आता छोटे-मोठे धंदे, रोजगाराची कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी झाले पाहिजे. तसेच शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीने परंपरेने घरी चालत आलेल्या व्यवसायाची सारी कौशल्ये कसली लाज न बाळगता आत्मसात केली पाहिजेत. उदाहरणार्थ एखादा तरुण जर न्हावी जातीचा असेल किंवा कुंभार जातीचा असेल आणि जर एम.ए. बी.एड. होऊनही तो सुशिक्षित बेरोजगार असेल तर, श्रमसंस्कृतीचे महत्त्व जाणून तो स्वतःच्या घरच्या व्यवसायात प्रवेश करु शकतो आणि स्वतःचा रोजगाराचा प्रश्न सहजपणे स्वतःच मिटवू शकतो. तसेच ग्रामीण तरुणांनी बिडी-काडी, दारु, गुटखा आणि जुगार अशा सर्व व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे आणि त्याने शहरातल्या चंगळवादी संस्कृतीची आस बाळगली नाही पाहिजे. तसेच प्रत्येक गावा-गावामधून समविचारी तरुणांचे संघटन उभा राहिले पाहिजे. या तरुणांनी गावात कशा रीतिने कार्यरत व्हावे, यासाठी हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार किंवा भास्करराव पेरे-पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. यासाठी लेखकाला सक्रिय होऊन स्वतःची वाणी आणि लेखणी सज्ज ठेवावी लागेल. गावात योग्य ते सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अधिकाधिक समाजाभिमूख कार्य करु इच्छिणाऱ्या तरुणांना जोडून घ्यावे लागेल. या तरुणांनी गावाभोवतीचे ओढे-नाले नि गावातल्या विहीरी-बारवा श्रमदानातून गाळमुक्त करुन गावातला जलस्त्रोत वाढवला पाहिजे. या सर्व कामात गावातील सुशिक्षित वर्गाने मोलाचा पुढाकार घ्यावा लागेल आणि कसलेही गटा-तटाचे राजकारण न करता स्वतःच्या गावाच्या विकासासाठी कार्यरत व्हावे लागेल. राजकारण आलेच तर ते वैचारिक मतभेदांचे असावे मात्र मनभेदांचे होऊ नये, यासाठी त्यांनी सतत दक्ष राहावे लागेल. तसेच या कृतिशील तरुणांनी गावात व्यायामशाळेची स्थापना करून उद्याची पिढी बलवान करावी लागेल. तसेच मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची मुहूर्तमेढ करण्यासाठी गावातून वर्गणी गोळा करुन समृद्ध असे ग्रंथालय उभारावे लागेल.या कामी त्यांनी लेखक, कवी आणि जेष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे लागेल. गावातल्या शाळेचे ग्रंथालयही सुसज्ज करावे लागेल; जेणेकरून शाळकरी मुले पुस्तकांकडे आकर्षित होतील आणि गावात सारासार विचार करणारी विवेकनिष्ठ अशी उद्याची पिढी निपजेल.
ख्यातनाम हिंदी कवी उदय प्रकाश म्हणतात:-
आदमी मरने के बाद कुछ नही सोचता
आदमी मरने के बाद कुछ नही बोलता
कुछ नही सोचने और बोलने पर
आदमी मर जाता है
वर कवितेत उद्धृत केल्याप्रमाणे गावातल्या निरक्षर माणसांची उद्या स्थिती-गती होऊ नये म्हणून आपल्याला विवेकनिष्ठ विचार करणारी पिढी निर्माण करायची आहे आणि त्या पिढीच्या निर्माणासाठी ग्रंथ किंवा पुस्तके अत्यावश्यकच असतात. तसेच तरुणांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षणाचे आणि स्पोकन इंग्लिशचे वर्ग गावात सुरु केले पाहिजेत; जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी संगणक साक्षर बनतील आणि इंग्रजीही शिकतील. शिवाय गावातल्या नोकरदार व धनिक वर्गाने आपली गाव-खेड्याशी असलेली नाळ कधीच तुटू न देता या तरुणांच्या मागे त्यांनी आर्थिक बळ उभे केले पाहिजे आणि खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तसेच गावातल्या गरीब घरातल्या, मागास जातीच्या हुशार नि चुणचुणीत मुलांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांना सहाय्य करावे लागेल. थोड³यात गावातली ही कर्ती-धर्ती माणसे कारभारी असतील आणि त्यांचा शब्द गावात मोलाचा असेल. गावात जर समजा काही तंटा-बखेडा झाला तर अशावेळी ते मार्गदर्शकाचे काम करतील आणि झालेला तंटा निःस्पृह वृत्तीने आणि सत्याला स्मरून ते मिटवतील. थोड³यात गाव पुन्हा गुण्या गोविंदाने आनंदाने नांदेल; कारण या कारभाऱ्यांचा शब्द गावात सर्वांसाठी प्रमाण मानला जाईल.
जेष्ठ कवी दत्ता हलसगीकर सामाजिक परिवर्तनाची दिशा दर्शवताना लिहितात:
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
ज्यांचे जन्म मातीत मळले
त्यांना उचलून वरती घ्यावे
वरील कवितेत निर्देशित केल्याप्रमाणे गावातील धनिक, सुशिक्षित वर्गाने गावातील कमकुवत नि खालच्या वर्गाच्या उत्थानासाठी कार्यरत व्हावे लागेल. तसेच सरकारच्या जुलूमी शेतकरीविरोधी तीन कायद्यांच्या पुनर्विचारासाठी सनदशीर मार्गाने नि अहिंसक वृत्तीने पाठपुरावा करावा लागेल. थोड³यात साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे'च्या मार्गाने आपली वाटचाल झाली पाहिजे; जेणेकरून आपला सर्वांचा उद्या हा सुख, समाधान नि शांतीचा असेल. अर्थात ह्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी आपल्याला आज मात्र खडतर नि कष्टप्रद वाटचाल करावी लागेल आणि त्या वाटचालीसाठीचे बळ या विचार मंथनातूनच मिळणार आहे; म्हणूनच तर हा विचारांचा ‘जागर' आज संयोजकांनी येथे घातलेला आहे.
यानिमित्ताने काही संकल्प आपण सारे मिळून करुया आणि सर्वे भवन्तु सुखिन:ची सुखावह अनुभूती घेऊया.
संकल्प:
1 .गावात कुऱ्हाडबंदी असेल. (शक्यतो जिवंत झाड तोडले जाणार नाही.)
2 .गावात दारूबंदी व गुटखाबंदी असेल.
3. गावात होणारे वाद नि झगडे कारभारी माणसेच मिटवतील. (पोलीस स्टेशनला एकही भांडण जाणार नाही.)
4. विविध जाती-धर्मांचे सण-उत्सव, ऊरुस आणि महापुरुषांचे जयंती उत्सव सारे मिळून आनंदाने साजरे करतील.
5. लग्न समारंभात साधेपणा राहील. अनावश्यक खर्चाला फाटा दिला जाईल.
6. मुलांच्या वाढदिवसाला छोटी-छोटी पुस्तके भेट दिली जातील.
7 .गावाकडचा माणूस महाराष्ट्रभर कुठेही गेला तरी मराठीतच बोलेन. (फारच गरजेचे असेल तरच इतर भाषेचा उपयोग करेल.)
8 .प्रत्येक जण वर्षाला किमान दोन पुस्तके विकत घेईल.
9. आपल्या गावातली शाळा अत्याधुनिक व्हावी म्हणून प्रत्येक जण शाळेला यथाशक्ती अर्थ सहाय्य करेल.
10. श्रमदान, शांततामय रीतीने आंदोलन, गावातले सार्वजनिक उत्सव आणि मतदान प्रक्रिया यांमध्ये प्रत्येक जण सहभागी होईल. धन्यवाद.


stay connected