*पुणे येथे ‘हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट प्रशिक्षण’ यशस्वीरित्या पार बीड जिल्ह्यातील ‘हॅलो किसान’सह महाराष्ट्रातील २५ कंपन्यांची निवड;*
पुणे *(प्रतिनिधी)* महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आयोजित ‘हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स’ (Horticulture Export Training Course) हा पाच दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पुणे येथे उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.
या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड करण्यात आलेल्या २५ नामांकित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 'हॅलो किसान अॅग्रो सोल्युशन फार्मर प्रोड्युसर कंपनी' यांचा देखील समावेश होता,या प्रशिक्षणाचा उद्देश राज्याच्या कृषी क्षेत्रातून अधिकाधिक दर्जेदार फळे, भाजीपाला व बागायती उत्पादनांची निर्यात वाढविणे हाच होता. प्रशिक्षणादरम्यान विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी उपस्थित प्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची व्याप्ती, निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे, परवाने, सर्टिफिकेशन प्रक्रिया (GAP, HACCP, APEDA), इम्पोर्ट-एक्सपोर्ट कायदे, फूड सेफ्टी स्टँडर्ड, भांडवली गुंतवणूक, लॉजिस्टिक्स आणि कोल्ड चेन व्यवस्थापन याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.‘हॅलो किसान’ कंपनीचे प्रतिनिधी आकाश गर्जे यांनी आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले की, "आम्हाला या प्रशिक्षणामुळे जागतिक व्यापार प्रक्रियेचा संपूर्ण अभ्यास करता आला. आम्हाला आमच्या उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे आणि निर्यात ही त्यासाठीची मोठी संधी आहे. शासनाचे व कृषी विभागाचे आभार की त्यांनी आम्हाला ही संधी दिली." या प्रशिक्षणाद्वारे सहभागी कंपन्यांनी ना केवळ निर्यात प्रक्रियेबाबत ज्ञान मिळवले, तर अनेक नव्या संधी व उद्योगांच्या कल्पना समजून घेतल्या. जागतिक बाजारपेठेत प्रवेश करताना कोणत्या बाबींची विशेष काळजी घ्यावी लागते, कोणत्या देशांना कोणत्या प्रकारचे उत्पादन जास्त प्रमाणात लागते, पॅकेजिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंतची गुणवत्ता कशी राखावी – हे सारे प्रशिक्षणाद्वारे स्पष्ट झाले.
या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांनी एकमताने सांगितले की, अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे कृषी उत्पादक कंपन्यांचे क्षितिज अधिक व्यापक होते आणि त्यांना स्थानिक मर्यादांपलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळते.कृषी विभागाच्या या उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत असून, भविष्यात अधिकाधिक कंपन्यांना याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा सहभागी कंपन्यांनी आणि शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. या प्रशिक्षणामधून तयार झालेली 'एक्सपोर्ट रेडी टीम' ही महाराष्ट्रासाठी एक नवा निर्यात यशोगाथा लिहिणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
stay connected