लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांनी केली वर्ग मंत्रिमंडळाची निवड

 लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांनी केली वर्ग मंत्रिमंडळाची निवड



 मतदान केंद्र, मतदान अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात रांगेत ईव्हीएम मशीनवर मतदान

श्रीरामपूर: निवडणूक प्रक्रिया काय असते, मतदान केंद्र, ईव्हीएम मशीन, मतदान अधिकारी यांच्या समवेत मतदान कसे करावे आदींचे धडे प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालयात नुकतेच वर्गनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात आले. 

लोकशाही पद्धतीने होणारी प्रत्यक्षातली निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाली. या निवडणूक प्रक्रियेतून कन्या व मुले विभागातील प्रत्येक वर्गाचे वर्ग मंत्रिमंडळ या निवडणुकीतून तयार करण्यात आली. शिक्षकांच्या संकल्पनेतून शालेय वर्ग मंत्री मंडळाची निवडणूक घेण्याचे नियोजन केले. यासाठी ॲपच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन तयार करून प्रत्यक्षात डिजिटल बोर्ड तयार केले. इच्छुक उमेदवारांची घोषणा झाली. उमेदवारांना चिन्हही देण्यात आली. विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे याचे धडे वर्गातून इंटरॲक्टिव्ह बोर्डवर देण्यात आली. विद्यार्थ्यांना मॉकपोल दाखवून अधिकारी एक-दोन-तीन व केंद्राध्यक्ष यांच्या उपस्थित मतदान गोपनीय पद्धतीने करून घेण्यात आले. अधिकाऱ्यांचे कामकाज काय असते याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बॅलेट बटन दाबताच पसंतीच्या उमेदवारापुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो व विशिष्ट आवाज येतो. ही प्रक्रिया अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते. याशिवाय मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रत्यक्षातला अनुभव घेऊन विद्यार्थी भारावून गेले. कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका नलिनी जाधव, माधुरी वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया आनंददायी आणि उत्साहात पार पडली. यावेळी सर्व वर्गशिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून उत्तम कर्तव्य बजावले. ही प्रक्रिया राबविण्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी विलास गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले. मुले विभागात ही प्रक्रिया मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, गणेश चेचरे, रेणुका वरपे, प्रियंका भालेराव, शुभांगी भरसाकळ, बाबासाहेब अंत्रे याशिवाय वर्गशिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांनी सांगितले, की आधुनिक पद्धतीचा वापर करून लहानपणापासून लोकशाहीचे धडे दिले तर विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील. निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारे विद्यार्थ्यांना अनुभवताना त्यांच्यातील उत्सुकता आणि चेहऱ्यावरील आनंद हेच या प्रक्रियेचे फलित असल्याचे मत व्यक्त त्यांनी केले. ही प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून,सांस्कृतिक विभागप्रमुख संगीता उगले,प्रफुल्ल नव्हाळे,गुरुकुल प्रमुख सुजाता ठाकरे,विजयश्री पंडित, नंदादेवी बैसाणे, कमल थिटे,मीनाक्षी गांगुर्डे, दिपाली आंबेकर, शैलजा सातपुते,सुवर्णा भोसले अश्विनी सोहनी यांनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.