साबलखेडचा बसस्थानक निवारा पाडणारे अद्यापही मोकाटच शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी भर पावसात ताटकळत उभे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

 साबलखेडचा बसस्थानक निवारा पाडणारे अद्यापही मोकाटच
शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी भर पावसात ताटकळत उभे 
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी 

 





आष्टी प्रतिनिधी- तालुक्यातील साबलखेड येथील अहिल्यानगर बीड मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत आमदार फंडातून बांधण्यात आलेला बस प्रवासी निवारा व उपहारगृह गावातील काही अज्ञात व्यक्तीने पाडून त्याचे वीट पत्रे लोखंडी अँगल व पाईप लंपास केले आहे.  प्रवासी व शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बस स्थानक नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना भर पावसात बसची वाट पाहत भर पावसात ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशासह ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. बस स्थानक पाडणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

तालुक्यातील साबलखेड या गावासह अनेक ठिकाणी माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी आपल्या आमदार फंडातून बस थांबा बांधले होते. त्यामुळे प्रवाशांना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळत होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व बस थांबा पाडल्याने प्रवाशांना भर पावसात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. यातच सकाळी शाळा असल्याने लहान मुलांना भर पावसात भिजून भिजलेल्या अंगानेच शाळेत जावे लागत आहे यामुळे ग्रामस्थ व प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. साबलखेड बस स्थानक पडल्याप्रकरणी काही ग्रामस्थांनी आष्टी येथील आगार प्रमुख यांना माहिती दिली होती. आगार प्रमुख यांनी सदरील प्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनला कारवाईबाबत पत्र पाठवले होते. तरीही संबंधितावर कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच बसस्थानक पाडल्यानंतर बस स्थानक व परिसरात  मुरुमाचा भराव टाकल्याने जाणीवपूर्वक बस स्थानक पाठीमागील रस्ता ही बंद करण्यात आला आहे. बस स्थानक पाडून तेथे मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी न भरता मुरूम टाकण्यात आलेला आहे. 

_________

बस स्थानकाजवळच महामार्गावरील पूल असून पुलाच्या नळकांड्या एका बाजूने बूजल्याने येथे येणारे पावसाचे  पाणी साबलखेडचे ग्रामदैवत संत बाळूदेव महाराज यांच्या मंदिरात व परिसरात जमा होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदरील बस स्थानक पाडणाऱ्या वर तात्काळ कारवाई करण्यात यावी नसता आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

__________

प्रवासी निवारा पाडल्याने शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना भर पावसाळ्यात भिजावे लागत आहे. साबलखेड येथे न्यू धानोरा या नावाने रेल्वे स्टेशन असून येथे परत नवीन बस स्थानक बांधणे गरजेचे आहे. बस स्थानक पाडणाऱ्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या मालमत्तेचे नुकसान करून वस्तूंची चोरी करणे, शासनाची रॉयल्टी न भरता अवैधरीत्या शेकडो ब्रास मुरूम टाकने इत्यादी प्रकरणी तात्काळ सदरील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधी तसेच राज्य परिवहन विभागाणे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.