विरोधकांकडून नागरिकांमध्ये हिंदी भाषेवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न - डॉ. ऋषिकेश विघ्ने

 विरोधकांकडून नागरिकांमध्ये हिंदी भाषेवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न - डॉ. ऋषिकेश विघ्ने




बीड(प्रतिनिधी), २८ जून २०२५: शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय पक्षांनी राजकारण न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन डॉ. ऋषिकेश विघ्ने यांनी शनिवारी (ता. २८) केले आहे. राज्य सरकारने कोणत्याही भाषेची सक्ती केलेली नाही, उलट सर्व भाषांचा आदर राखत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, यावरही विरोधकांकडून नागरिकांमध्ये हेतुपरस्सर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत डॉ. विघ्ने यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


मराठी ही आपली मातृभाषा असून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला मराठीचा, आपल्या मायबोलीचा सार्थ अभिमान होता, आहे आणि नेहमीच राहील. राज्यात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांनी देखील मराठीचा अभिमान बाळगलाच पाहिजे. तथापि, केवळ भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करणे, ही पुरोगामी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असू नये, असेही आवाहन डॉ. विघ्ने यांनी यावेळी केले.


हिंदी भाषेची सक्ती नाही; शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलांसाठी निर्णय महत्त्वाचा


डॉ. विघ्ने यांनी स्पष्ट केले की, हिंदीची सक्ती हा सरकारचा निर्णय नसून, तो विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक समृद्धीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत सकारात्मक आहे. असे असतानाही, काही राजकीय पक्षांकडून याबाबत जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


हिंदी ही केवळ उत्तर भारताची भाषा नसून, ती देशाची संपर्क भाषा आहे. आंतरराज्यीय संवाद साधण्यासाठी आणि देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. मात्र, कोणत्याही भाषेची सक्ती हा सरकारचा अजेंडा नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हिंदी शिकणे हे ऐच्छिक असेल आणि त्यात कोणत्याही विद्यार्थ्यांवर सक्ती केली जाणार नाही, अशा शब्दांत डॉ. विघ्ने यांनी सरकारच्या या दूरदृष्टीच्या निर्णयाचे स्वागत केले.


विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषा अवगत असणे, ही त्यांची भविष्यातील ताकद ठरेल. महाराष्ट्र हे एक प्रगतशील राज्य असून, शिक्षणाच्या बाबतीतही ते नेहमीच अग्रेसर राहिले आहे. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजात भाषिक धोरणांवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार निंदनीय आहे. विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती न करता त्यांना योग्य पर्याय उपलब्ध करून देणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे, असेही डॉ. विघ्ने म्हणाले.


तीन भाषा तत्त्वानुसार, मराठीसह इंग्रजी आणि हिंदी शिकल्यास विद्यार्थी जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम बनतील. बहुभाषिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमताही अधिक विकसित होते आणि त्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो. विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना, भविष्यात सरकारी, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी बहुभाषिक कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हिंदीसारख्या संपर्क भाषेचे ज्ञान त्यांच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलांसाठी घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल, असा विश्वासही डॉ. ऋषिकेश विघ्ने यांनी व्यक्त केला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.