दर्शनासाठी आला; अन पोहण्याचा मोह जीवावर बेतला
-----------------
चाळीसगावच्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू
--------------------
राजेंद्र जैन / कडा
---------------
तालुक्यातील मायंबा येथे देवदर्शनासाठी आलेल्या तरुणाला पोहण्याचा मोह आवरला नाही. तरूणांसोबत जवळच्या तलावात पोहण्यासाठी गेला. मात्र, दमछाक झाल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. ओमकार गोकुळ गडरी- (वय-२२), रा. मेहुनबारी ता. चाळीसगांव, जि. जळगांव) असे पाण्यात बुडलेल्या तरुणाचे नाव आहे.
खान्देश मधील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारी येथील रहिवाशी ओमकार गोकुळ गडरी या नावाचा तरुण आष्टी तालुक्यातील मायंबा सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवदर्शन करण्यासाठी आला होता. मात्र त्याला पोहण्याचा मोह न आवरल्याने तो इतर तरूणांसोबत जवळच असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला. सोमवारी दुपारच्या सुमारास ओमकार हा तळ्यात पोहण्यासाठी उतरला. पण पोहताना दमछाक झाल्याने पाण्यात गंटागळ्या खात तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोक मदतीसाठी धावून आले. आणि वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र त्याचा शोध लागला नाही. या घटनास्थळी आष्टीच्या तहसिलदार वैशाली पाटील, अंभोरा पोलिसांनी भेट दिली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास सावरगावच्या स्थानिक तरुणांना अखेर हा मृत्यूदेह शोधण्यात यश आल्याचे समजले. त्यानंतर धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत तरुणाचे सेवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
-------%----
stay connected