शेतकऱ्यांनी उच्च प्रतीचे सिमेन वापरून घरीच दुधाळ गाई तयार कराव्यात : आ.सुरेश धस
आष्टी: प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे.आष्टी तालुक्याने दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात क्रांती करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने उच्च प्रतीचे सिमेंन वापरून घरीच दुधाळ गाई तयार करण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले.
आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ मर्यादित आष्टी यांच्या वतीने मोरेश्वर मंगल कार्यालय येथे दूध उत्पादक शेतकरी चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना आ. धस म्हणाले की,आष्टी तालुक्यामध्ये दुधाळ गाईंची संख्या कमी प्रमाणात आहे .ती संख्या वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे सिमेंन वापरून घरीच दुधाळ गाई (कालवडी )तयार कराव्यात .त्याचप्रमाणे घरी तयार केलेल्या गाईचा औषधोपचार खर्चही कमी असतो. जनावरांचा आजार खर्च कमी करण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.प्रत्येक शेतकऱ्याने गोठा आठवड्यातून एकदा तरी निर्जंतुक करणे आवश्यक आहे. तसेच मुरघास करण्यासाठी बॅगचा वापर न करता जमिनीवर हौद करून मुरघास केल्याने त्यावर बुरशी येत नाही व मुरघास खराब होण्याचे प्रमाण अत्यल्प असते.यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीवर हौद करूनच उच्च दर्जाची मका वापरून कणसासहित मकाचा मुरघास करणे गरजेचे आहे.
या कार्यशाळेत डॉ.जालिंदर वांढरे, डॉ. संतोष गवारे, डॉ. मंगेश ढेरे डॉ. बाबासाहेब कुंभार, डॉक्टर संदीप शिंदे, डॉ. धनंजय राजगुडे डॉ. शशिकांत कारखेले या पशुवैद्यकीय डॉक्टर व पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये दुधाळ गाईची निवड करणे, पशु आहार व्यवस्थापन करणे, जनावरांचे घरगुती प्राथमिक उपचार व आयुर्वेदिक उपचार करणे, वंध्यत्व निवारण व दुबार ए.आय. करण्याचे कारणे व उपाययोजना, वंशावळ सुधारणा कृत्रिम रेतन व स्वार्टेड सिमेंन्सवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका दूध संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले, कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनवडे,दिनकर दाणी मामा,मोहन झांबरे सर्व संचालक मंडळ तालुक्यातील सर्व छोटे मोठे व मध्यम दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन करणारे चेअरमन महिला दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected