शरणपूर वृद्धाश्रमास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, सह सचिव प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर,मकरंद घोडके यांची भेट
नेवासा (प्रतिनिधी): 'समाजातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्याचे अवघड काम शरणपूर वृद्धाश्रमाच्या माध्यमातून होत असून हीच खरी समाजसेवा आहे'. असे मत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केले.
नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील शरणपूर वृद्धाश्रमास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, सह सचिव प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर,मकरंद घोडके यांनी नुकतीच भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
सुनील गोसावी यावेळी बोलताना म्हणाले की, पदव्युत्तर शिक्षणानंतर रावसाहेब मगर यांनी ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्याचा घेतलेला वसा अत्यंत महत्त्वाचा असून त्यांना सर्व समाजाने साथ देणे आवश्यक आहे, सुखदुःखाच्या प्रसंगी या ज्येष्ठ नागरिकांची आठवण समाजातील सर्वच घटकाला आली पाहिजे आणि त्या प्रित्यर्थ वृद्धाश्रमाला आवश्यक गोष्टी भेट दिल्या पाहिजेत.
प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर बोलताना म्हणाले की, घरातील एक व्यक्ती सांभाळणे कठीण असताना अनेक वृद्ध स्त्री, पुरुषांना सांभाळणे हे कठीण काम आहे, ते मगर दांपत्य करत आहे,यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल. तर मकरंद घोडके बोलताना म्हणाले की, निसर्गाच्या सानिध्यात उभा राहत असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमास भेट देऊन, तेथील परिस्थिती पाहून आवश्यक ती मदत केली पाहिजे. आजच्या व्हाट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात या संस्थेचे कार्य सर्वांपर्यंत जाण्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत.
यावेळी शरणपूर वृद्धाश्रमाचे संस्थापक रावसाहेब मगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. तर वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक. संतोष मगर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब मुटकुळे, संस्थेच्या सचिव सुरेखा मगर, संतोष गवते, फत्तेपूर येथील उपसरपंच दत्तात्रय गवते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
stay connected