*आष्टी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील तिघेजण झाले फौजदार*
आष्टी ( प्रतिनिधी ) = आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील कमलेश चौधरी, ब्रह्मगाव येथील प्रद्युम्न डाळिंबकर आणि खडकत येथील संभाजी सूर्यवंशी हे शेतकरी कुटुंबातील युवक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पीएसआय झाले आहेत .
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी असलेल्या कमलेश चौधरी यांचे वडील शहादेव चौधरी आणि आई चंद्रकला चौधरी या हे शेतकरी आहेत. कमलेश याने बारावीचे शिक्षण कडा येथील श्रीराम विद्यालयातून घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत अभ्यास करायचा यासाठी बीए ला कड्याच्या धोंडे महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर अहिल्यानगर येथील न्यू आर्ट कॉलेजमधून एम ए पूर्ण केले . स्पर्धा परीक्षेतून यश मिळवण्यासाठी स्वयं अध्ययन करत अभ्यास सुरू ठेवला. सेट परीक्षेत देखील यश मिळवले . मागील महिन्यात महसूल सहायक म्हणून त्याची निवड झाली . आता नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत देखील त्यांनी यश मिळवले आहे .
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील मोहन आणि कमल डाळिंबकर या शेतकरी दांपत्याचा प्रद्युम्न मोठा मुलगा. त्याने आष्टी येथील गणेश माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर आष्टीच्या हंबर्डे महाविद्यालयातून बीएससी शिक्षण पूर्ण केले . बारावी नंतर तटरक्षक दलात नाविक म्हणून त्याची निवड झाली होती. मात्र यूपीएससी करण्यासाठी त्याने ती नोकरी सोडून दिली . पोलीस भरतीमध्येही प्रयत्न केला , मात्र तिथे अपयश आले. PSI परीक्षेमध्ये दोनदा प्रयत्न अयशस्वी राहिला . परंतु अपयशाने खचून न जाता त्याने अभ्यास आणि शारीरिक मेहनत या दोन्हीवर लक्ष केंद्रित केले . त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यशाला गवसणी घातली . आष्टी तालुक्यातील खडकत येथील हरिभाऊ सूर्यवंशी आणि रुक्मिणी सूर्यवंशी या शेतकरी दांपत्याचा संभाजी हा धाकटा मुलगा. त्याने अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एम टेक (ॲग्री) ही पदव्युतर पदवी संपादन केली. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला . फेब्रुवारी महिन्यात जाहीर झालेल्या निकालात संभाजी यांनी कर सहाय्यक आणि महसूल सहायक या दोन परीक्षांमध्ये यश मिळवले . आता नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत देखील यश मिळवत यशस्वितेचा तिहेरी झेंडा रोवला आहे .
stay connected