शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
आष्टी प्रतिनिधी ( सय्यद शौकत): शेती पिकविण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दोन बोअरवेल घेतले. ते कोरडे गेले, पाणी नसल्याने शेती नापिक झाली. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. यातून आर्थिक चणचण निर्माण होऊन आलेल्या नैराश्यातून ५७ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना वाघळूज येथील लमाण तांड्यावर गुरुवारी घडली. अंबादास काशीनाथ राठोड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अंबादास राठोड या शेतकऱ्याने काही महिन्यांपूर्वी शेतात पाण्यासाठी दोन बोअर घेतले होते; पण ते दोन्ही बोअरवेल कोरडे गेले, शेतीला पाण्याची सोय नसल्याने शेती नापिक झाली. त्यातच लोकांचे व बँकेचे कर्ज असा आर्थिक भार डोक्यावर पडला; पण तो फेडायचा कसा ? याच विवंचनेत गुरुवारी सकाळी जगदंबा माता मंदिर परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन अंबादास राठोड याने जीवन संपविल्याची घटना घडली. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंभोरा ठाण्याचे पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, महेश जाधव यानी पंचनामा केला. मृताच्या पश्चात दोन मुले, सुना, पत्नी असा परिवार आहे.
stay connected