मुंबईत असुन देखील गांवाशी नाळ जोडलेली आहे, त्याबद्दल तुमचे कौतुक - माजी आ. भीमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर हे तालुके कायमस्वरूपी दुष्काळी आहेत त्यामुळे या भागातील लोक शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात, शहरात येऊन स्थायिक झाले तरी आपण आपल्या गांवाशी नाळ जोडलेली आहे हि बाब तुमच्या दृष्टीने अतिशय कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई, पनवेल परिसरात विविध व्यवसाय आणि काम धंद्याच्या तसेच नौकरीच्या निमित्ताने रहात असलेल्या आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मायबाप जनतेशी संवाद साधण्यासाठी रविवारी माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली नविन पनवेल येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृती गर्जे हे होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक काकासाहेब कुत्तरवडे, राजेंद्र वनवे, बबनराव बारगजे, मच्छिंद्र झगडे,भारत गर्जे, सरपंच सुरेश गोल्हार, माजी सरपंच बाळासाहेब पवार, गोपिनाथ मुंडे,सरपंच अभय गर्जे, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, हरिदास वनवे, विकी शेकडे, संतोष आमले, सुभाष आंधळे, सुधाकर गर्जे,संदीप गर्जे, आदेश निमोणकर व इतरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आपला मतदारसंघ दुष्काळी आहे.
त्यामुळे आपल्या भागातील हजारो लोक मुंबई, पनवेल, पुणे, सुरत, संभाजीनगर अशा मोठ्या शहरात काम धंद्याच्या निमित्ताने स्थलांतरित होतात. परंतु त्यांनी आपल्या गावाशी नाळ तोडलेली नाही हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी सर्व जातीं धर्माच्या लोकांसाठी काम करतो, मी कधीही जातीभेद केला नाही. आपल्या संस्थेत सर्वं जाती धर्माचे लोक नोकरी करतात. मतदारसंघातील लोकांच्या आग्रहास्तव निवडणुक लढवत आहे. आपल्या भागातुन खेड्यापाड्यातील लोक इकडे येऊन ३० ते ४० कंटेनरचे मालक झालेत आणि त्यांचा वाहतुकीचा मोठा व्यवसाय यांचा मला खुप अभिमान वाटतो. काहीजण उच्चशिक्षित आहेत ते नोकरी करतात. काही तर अशिक्षित असुन सुद्धा इकडे येऊन जागा घेऊन त्यांनी घरे बांधली आहेत खरोखरच त्यांनी कष्टातून चांगली प्रगती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी एकदा स्व. गोपीनाथराव मुंडे उमेदवार होते. मतदारसंघातील फक्त मीच त्यांच्या सोबत होतो. मुंडे साहेबा़ंचा वारसा आ. पंकजाताई यांनी चालवला आहे. लोकसभेला आ.पंकजाताई मुंडे यांचा झालेल्या पराभवाची सल मनात आहे. त्यांच्या विजयासाठी मी खुप प्रयत्न केला. मतदारसंघाच्या विकासासाठी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला आहे.मी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि मी निवडणुक लढवणारच आहे. गहिनीनाथ गड आणि विठ्ठल महाराज यांच्याशी माझं अतूट नातं आहे मी प्रत्येक वर्षी दिंडीत सहभागी होत असतो. अजुनही मतदारसंघातील बरेच गोरगरिब ऊसतोडणीसाठी जातात त्यांची ऊसतोड कायमची बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तुम्ही
कुठल्याच बाबतीत घाबरु नका मी तुमच्या सोबत आहे. यावेळी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याच्या वतीने माजी आमदार भीमराव धोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की,आ. पंकजाताई मुंडे यांची मनापासून इच्छा होती की धोंडे साहेबांना उमेदवारी मिळावी. उमेदवारी मिळाली नाही तरी आपण सर्व ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुंबई व परिसरात रहात असलेल्या सर्वांनी मतदानाला येऊन साहेबांना सहकार्य करावे. लोकसभा मतमोजणीप्रसंगी आ. पंकजाताई ताई सोबत पालकमंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि धोंडेसाहेबच होते. याप्रसंगी नगरसेवक काकासाहेब कुत्तरवडे, सरपंच सुरेश गोल्हार,भारत गर्जे,गोपिनाथ मुंडे व इतरांची भाषणे झाली. सुत्रसंचलन महारुद्र खेडकर यांनी केले. कार्यक्रमास पनवेल, मुंबई परिसरातील नागरिक उपस्थित होते.
stay connected