*राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आमदारांनी रेल्वेचे श्रेय घेण्याची नौटंकी थांबवावी - सलीम जहाँगीर*
*मुंडे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट पंकजाताई आणि प्रितमताईंच्या प्रयत्नांमुळेच साकार होत आहे*
बीड ( प्रतिनिधी ) देशात 70 वर्ष एक हाती सत्ता असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला बीडच्या रेल्वेसाठी साधी एक वीट सुद्धा आणता आली नाही. आता मात्र आयत्या पिठावर रेघोट्या याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि आमदार मागे पुढे करत बैठका घेऊन चमकोगिरी करू लागले आहेत. परळी-बीड - अहमदनगर हा रेल्वेमार्ग दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे आणि माजी खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नामुळेच जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न साकार होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार - आमदारांनी ही नौटंकी थांबवावी असे पत्रक भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी -बीड - अहमदनगर रेल्वे मार्गाचा प्रोजेक्ट हा भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळेच मुंडे साहेब खासदार झाल्यापासून बीडला रेल्वे यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुंडे साहेबांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे बीडला आले होते. त्यावेळी त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते की, बीडला रेल्वे यावी हे मुंडे साहेबांची स्वप्न होते आणि ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार असा शब्द नरेंद्र मोदी यांनी दिला होता.
जिल्हावासियांच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्याने भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी स्वतः या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तर तत्कालीन खासदार प्रितमताई मुंडे यांनी देखील देशाच्या संसदेत हा प्रश्न मांडून प्रामुख्याने जास्तीत जास्त निधी बीडच्या रेल्वेसाठी कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच आज आष्टी - अंमळनेर पर्यंतचा रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून बीड शहरापासून काही अंतरावर हे काम युद्धपातळीवर सुरू आहे ते केवळ पंकजाताई आणि प्रितमताई यांच्यामुळेच. त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणून आज जिल्हावासियांना रेल्वे पाहायला मिळत आहे. मात्र काल परवा निवडून आलेल्या लोकांना हे सर्व काही आमच्यामुळेच झाले आहे असेच वाटू लागले आहे. त्यामुळेच अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन ते पुढे मागे करत चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. आम्ही बीडचा रेल्वेसाठी खूप काही केले आहे असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून होऊ लागला आहे. मात्र जिल्ह्याची जनता सुजाण आहे. कोण खरं, कोण खोटं हे ते जाणून आहेत. त्यामुळे जनता आशा चमकोगिरी करणाऱ्या आणि बैठका घेऊन नौटंकीचा प्रयत्न करणाऱ्यांना कधीच थारा देणार नाही असा विश्वास भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केला.
stay connected