ॲड. नरसिंह जाधव यांचा गावभेट दौरा
आजी- माजी कुणीच नको आम्हाला सुशिक्षित,चांगली प्रतिमा असलेला उमेदवार हवा.जनतेतून होतेय मागणी
आष्टी प्रतिनिधी -
आगामी विधानसभेसाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू असून, मतदारसंघातील गावागावात इच्छुक उमेदवार जाऊन, निवडणुकीला उभे राहणार असून आपल्याला मदत करावी अशी मागणी करीत आहेत. यामध्ये पाटोदा तालुक्यातून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून ॲड. नरसिंह जाधव हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे आपल्याला उमेदवारीची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील गावागावात भेटी देऊन सर्व सामान्य लोकांशी चर्चा केली. यावेळी जनतेतून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदार संघातील प्रस्थापित नेत्याबद्दलचा रोष नागरिक बोलून दाखवित आहेत. केवळ पर्याय नसल्यानेच दगडापेक्षा वीट मऊ यामुळे कुणाला तरी मते द्यावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत असून ॲड. जाधव यांना निवडणूक लढविण्यासाठी तन मन धनाने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास नागरिक बोलून दाखवित आहेत.
ॲड. नरसिंह जाधव यांनी गेल्या वर्ष भरापासून मतदार संघात संपर्क ठेवून आहेत. तीन दिवसांत त्यांनी आष्टी तालुक्यातील आष्टी शहर, चिंचपूर, आष्टा, मैदान मातकुळी, मातावळी, भातोडी, खेडकर सांगवी, खडकत, टाकळसिंग व पाटोदा तालुक्यातील सुप्पा सावरगाव, वहाली, अंतापूर,मूगगांव, चिंचोली येथील जेष्ठ मंडळी, युवा सहकारी तसेच गावकऱ्यांची भेट घेतली, त्याप्रसंगी तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा करण्यात येऊन. सर्व सामान्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावले जात आहेत. काही प्रकरणात न्यायालयीन लढा लढण्यासाठी कायदेशीर मदतही लोकांना होत असल्याने जनतेतून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
_________
मतदारसंघातील भ्रष्टाचारी आणि दहशतीचे राजकारण संपण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात
यावेळी लोकांशी चर्चा करताना ॲड. नरसिंह जाधव यांनी सांगितले की, आज आष्टी मतदार संघात आतापर्यंतच्या नेतृत्वाने केवळ आपले आणि आपल्या बगल बचच्याचे घरे भरुन सर्व सामान्य जनतेची पिळवणूक केली आहे. आज मतदार संघात भ्रष्टाचार आणि दहशतीचे वातावरण आहे. शासकीय योजना मंजूर करून आणायच्या आणि कागदोपत्री योजना राबवून शासकिय पैसा आपल्या खिशात घालायचं हेच धोरण राबविले जात आहे. या विरोधात कुणी आवाज उठविला तर त्याला दाबण्यसाठी जोर जबरदस्ती करून आवाज दाबला जातो. मात्र आपण या विरोधात आवाज उठविला. शासकीय योजनामधील भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात येऊन भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगून ही भ्रष्ट, दहशत संपविण्यासाठी आपण निवडणूक लढवीत असल्याचे ॲड. जाधव यांनी सांगितले.


stay connected