बैल पोळ्याला सजावट साहित्य खरेदीसाठी शेतक-यांची लगबग
----------------
साज-शृंगाराच्या साहित्याने कड्याची बाजारपेठ सजली
----------
राजेद्र जैन/ कडा
---------------
यंदा वरुणराजाची चांगलीच कृपादृष्टी झाल्याने पावसाने समाधान केले. त्यामुळे बैल पोळ्याचा उत्साह ब-यापैकी वाढला आहे. हा श्रावणी बैल पोळा साजरा करण्यासाठी बाजारात लगबग वाढली आहे. सजावटीसाठी लागणा-या साज- शृंगाराच्या साहित्याने बाजारपेठा गजबजल्या. मात्र सध्या ग्रामीण भागात बैलशेती ऐवजी ट्रॅक्टर शेतीला पसंती असल्याने बैलाची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे.
श्रावणी बैल पोळा साजरा करण्यासाठी आष्टीसह कडा, धानोरा, धामणगाव येथील बाजारपेठ साज- शृंगाराच्या साहित्याने सजल्या आहेत. बाजारात व्यापा-यांनी बैल सजावटीच्या साहित्यांची दुकाने थाटली आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेतात जनावरांसाठी हिरवा चारा मुबलक उपलब्ध झाला. त्यामुळे शेतक-यांच्या उत्साहात अजूनच भर पडली आहे. बाजारात बैलाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शेतक-यांची लगबग वाढली आहे. कवडीमाळ, शिंगाचे गोंडे, बाशिंग, हिंगुळ, झुल, शेंब्या, सुताचा कासरा, शिंदोरी, चाळ, घुंगरु, मोहरकी, पैजन, विविध रंग, संत्रामाळ, सरजोडी आदी बैल सजावट साहित्याची दुकाने गजबजली. परंतू ग्रामीण भागात सध्या बैलशेती ऐवजी ट्रॅक्टर शेतीला पसंती मिळत असल्यामुळे बैलाची संख्या कमी झाली आहे. तर दुसरीकडे पोळ्याला बैलांची सजावट करण्यासाठी आवश्यक साज- शृंगाराच्या साहित्यांच्या दरात जवळपास पंधरा ते वीस टक्यांची वाढ झाल्याचे व्यापारी सुनिल अष्टेकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सरकारी कृपेने भरमसाट महागाई वाढली असली तरी वर्षेभर उन्हा-पावसात शेतात राबणा-या सर्जा- राजाला वर्षातून एकदा होईना पुरणपोळीचा खास भरवून हा पोळ्याचा सण जल्लोषात साजरा करण्यासाठी शेतक-यांमध्ये नेहमीचाच उत्साह पाहायला मिळत आहे.
-----%%--------
साज- शृंगाराने दुकाने गजबजली
----------------
वरुणराजाने यंदा चांगली हजेरी लावल्यामुळे शेतात हिरवा चारा मुबलक उपलब्ध झाला. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण आहे. यंदाही सरकारच्या महागाई स्पर्धेमुळे सजावट साहित्यांच्या दरात वाढ झाली असली तरी श्रावणी बैल पोळा साजरा करण्यासाठी बाजारात गर्दी वाढली असून, साज- शृंगाराच्या साहित्यांची दुकाने गजबजली असून, याही परिस्थितीवर मात करुन सजावट साहित्य खरेदीसाठी शेतक-यांमध्ये तोच उत्साह मात्र कायम दिसत आहे.
stay connected