डॉ स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन आष्टी येथे दर तासाला भव्य लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी ड्रॉ मधून बंपर बक्षीस महिलांसाठी खेळ पैठणीचा
आष्टी प्रतिनिधी
बीड व अहमदनगर जिल्ह्यातील लाखों शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी म्हणून शेतकऱ्यांचे नेते व माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन आष्टी येथे होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला मोफत भव्य लकी ड्रॉ बक्षीस तर शेवटच्या दिवशी भाग्यवान शेतकरी जोडीसाठी लकी ड्रॉ मधून बंपर बक्षीस मिळणार असुन लाडक्या बहिणींसाठी
उद्धव के.पी. प्रस्तूत महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम
खेळ पैठणीचा शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी होत आहे. यासाठी प्रथम बक्षीस आहे ११ हजार १०१ रूपयांची मानाची पैठणी याशिवाय इतर भरपुर बक्षिसे जिंकण्याची व विविध खेळ खेळण्याची संधी आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी येथील श्री. छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ, सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आयोजित चार दिवसीय भव्यदिव्य अशा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे व लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तर समारोप १ सप्टेंबर रोजी अ. भा. वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सांगली येथील व देशातील सर्वात उंच ४१ लाख रुपये किमंतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. गतवर्षी हे प्रदर्शन उशिरा झाले होते. शेतकऱ्यांना प्रदर्शनातून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. १ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी गतवर्षी कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला होता. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत कृषी संबंधित तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कृषी प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येईल व लकी शेतकऱ्यांला शेती उपयोगी भेट वस्तू देण्यात येईल. शेवटच्या दिवशी बंपर लकी ड्रॉ काढुन विजेत्याला बक्षीस दिले जाईल. कृषी प्रदर्शनात दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अत्याधुनिक मशिन, कुक्कुटपालन माहिती तसेच बॅंके मधून लोन कसे काढायचे यांची माहिती मिळणार आहे. गांडूळ खत कसे बनविने मार्गदर्शन, खवय्यांसाठी विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील खाद्यपदार्थ खाण्यासाठी व विक्री साठी स्टाॅल उपलब्ध असणार आहे.जिरेनियम शेती, खेकडा पालन, गोमातेच्या शेणापासून विविध वस्तू कशा निर्माण करायच्या यांची माहिती मिळणार आहे. महिलांनी घरबसल्या घरगुती व्यवसाय करणे, विविध प्रकारचे ट्रॅक्टर व अवजारे, शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला, नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील. गतवर्षी एकुण १०० स्टाॅल होते यावर्षी १५० स्टाॅल राहतील. गेल्या प्रदर्शनात ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती यावर्षी हा आकडा वाढणार आहे. हे प्रदर्शन मोफत आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.
प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, कृषी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, विद्यार्थी तसेच व्यवस्थापक बंडु पाचपुते, गणेश जठार व इतर टीम प्रयत्नशील आहेत.
stay connected