अंभोरा पोलिसांची कारवाई
अमीर सय्यद या गुन्हेगाराला केले जेरबंद
आष्टी प्रतिनिधी - अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील शिरापूर येथील अमीर भैय्या सय्यद हा आरोपी हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे जन्मठेपेची सजा भोगत असताना हा पॅरोल रजेवर आला व पुन्हा तो हजर झाला नाही. सदरील आरोपीचा शोध अंभोरा पोलीस करत असताना अमीर भैय्या सय्यद यास मंगळवार
दि.२० ऑगस्ट रोजी एका हॉटेल मधून पोलिसांनी शिताफीने अटक केली.
आष्टी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ०१/१६ कलम ३०२ भा.द.वि. मधील जन्मठेप सुनावण्यात आलेला आरोपी अमीर भैय्या सय्यद रा. शिरापूर ता. आष्टी हा सन २०२२ मध्ये पॅरोल रजेवर आल्यापासून फरार होता. त्याचेवर अंभोरा पोलीस स्टेशन गु.र.क्र.१५८/२२ कलम २२४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरील गुन्ह्यातील आरोपी विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. या अनुषंगाने अंभोरा पोलीस गुप्त बातमीदारामार्फत मिळेलेल्या माहितीच्या अनुषंगाने शोध घेण्यासाठी मा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळसाहेब, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी मंगेश साळवे साहेब, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, शरद पोकळे रवाना होऊन त्याचेवर ट्रॅप लावला असता तो शिरापूर परिसरातील एका हॉटेल मध्ये बसलेला होता. त्याच वेळी सदरील आरोपीवर झडप घेऊन त्यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयात हजर करुन पुढील कार्यवाही चालु आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरचा आरोपी अत्यंत शातीर असून यापूर्वी दोनदा पोलीस त्यास पकडण्यासाठी गेले असता तो त्यांचे हातातून तुरी देऊन पळून गेलेला होता.
stay connected