कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी सीना व मेहकरी धरणात सोडा
सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची जिल्हाधिकारी व मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे मागणी
आष्टी प्रतिनिधी- पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी आष्टी तालुक्यामध्ये दमदार असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यात काही गावात पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. तालुक्यातील निंबोडी तलाव वगळता एकही तलाव भरलेला नाही. त्यामुळे कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे 80 टक्के अधिक क्षमतेने सर्व धरणे भरलेले आहेत. कुकडीचे अतिरिक्त पाणी भीमा खोऱ्यातील श्रीगोंदा कर्जत व करमाळा तालुक्यातील सर्व तलाव व नदीच्या पात्रात सोडून बंधारे भरून घेतली जात आहेत. आष्टी तालुक्यातील पश्चिम बाजूच्या गावांना व परिसरात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे या भागातील तलाव नदी अद्याप कोरडेठाक पडले असून या परिसरातील विहिरींची व कुंपणलिकेच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी नदीचे पात्र व बंधारे कोरडेठाक आहेत. त्यामुळे कुकडीचे प्रकल्पाचे ओव्हर फ्लो चे पाणी भोसा खिंड मार्गे सीना धरणातून मेहेकरी धरणात सोडण्यात यावे. यामुळे मेहेकरी, आनंदवाडी, सराटेवडगाव, टाकळी रुई, शिराळ, फत्तेवडगाव, वाकी, दैठणा, चिखली, हिंगणी, टाकळसिंग, सांगवी आष्टी, खडकत यासह परिसरातील गावांना फायदा होणार आहे. त्यामुळे तात्काळ कुकडे प्रकल्पाचे ओव्हर फ्लो चे पाणी तात्काळ मेहेकरी धरणात सोडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टी विधानसभा अध्यक्ष (शरदचंद्रजी पवार गट) राम खाडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी व छत्रपती संभाजीनगर चे (पाटबंधारे विभाग) मुख्य अभियंता यांना सोमवार दि.12 आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
stay connected