राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - मा. आ. भिमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी
दिनांक २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन आष्टी येथे होत आहे. चार दिवस चालणारे कृषी प्रदर्शन म्हणजे बीड, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की , आष्टी येथील श्री. छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आयोजित चार दिवसीय भव्यदिव्य अशा कृषी प्रदर्शनाची संपूर्ण तयारी झाली आहे. गुरुवारी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे व लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी आष्टी तालुक्यातील विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबासाहेब पिसोरे, बबनराव झांबरे, विजयाताई घुले यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांमधून दर तासाला मोफत भव्य लकी ड्रॉ बक्षीस तर शेवटच्या दिवशी भाग्यवान शेतकरी जोडीसाठी लकी ड्रॉ मधून बंपर बक्षीस मिळणार असुन लाडक्या बहिणींसाठी उद्धव के.पी. प्रस्तूत महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी होत आहे. दररोज दुपारी कृषी संबंधित तज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अत्याधुनिक मशिन, कुक्कुटपालन, गांडूळ खत बनविने , जिरेनियम शेती, खेकडा पालन, गोमातेच्या शेणापासून विविध वस्तू बनविणे , महिलांनी घरगुती व्यवसाय करणे, विविध प्रकारचे ट्रॅक्टर व अवजारे इत्यादी माहिती मिळणार आहे. ४१ लाख रुपये किमंतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रदर्शन मोफत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे, निमंत्रक युवा नेते अजयदादा धोंडे यांनी केले आहे.
stay connected