कृषी दिंडीच्या माध्यमातून अजयदादा धोंडे यांचे आष्टीतील व्यापाऱ्यांना निमंत्रण
आष्टी (वार्ताहर) :- आष्टी येथे आजपासून होणाऱ्या मराठवाड्यातील सर्वात मोठया डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषि महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी आष्टी शहरातून कृषी दिंडी काढून व्यापाऱ्यांना युवा नेते अजय दादा धोंडे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका देऊन कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
बुधवारी सकाळी कृषी महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनींनी कृषी दिंडी काढली. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कृषी दिंडीची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे यांनी कृषी दिंडीत सहभागी होऊन आष्टी शहरात फिरून प्रत्येक व्यापाऱ्यांना भेटून निमंत्रण पत्रिका देत कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कृषी दिंडीमध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शेतकरी वेश परिधान केला होता. जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या,तसेच हातामध्ये शेती उपयोगी अवजारे व शेती संबंधित साहित्य हातात घेऊन कृषी दिंडीत सहभागी झाले होते. व्यापाऱ्यांनी युवा नेते अजयदादा धोंडे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.
stay connected