पिंपळोद जि.प.शाळेत शिक्षण सप्ताह विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत
सुनील शिरपुरे/यवतमाळ
अमरावती-पिंपळोद येथील जि.प.कन्या शाळा, उर्दू शाळा व जि.प.मुलांची शाळा या तिनही शाळांमध्ये शिक्षण सप्ताह या केंद्रपुरस्कृत कार्यक्रमाची सुरुवात २२ तारखेपासून झाली आहे. पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य निर्मिती, गोष्टी कट्टा, प्राणी, पक्षी, अन्न आणि भाजीपाला यांचे कार्ड बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला. याच उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून सुंदर मुखवटे तयार केले. तसेच विद्यार्थ्यांनी ससा आणि कासव यांच्या गोष्टीचे सुंदर नाट्यीकरणसुद्धा करून दाखवले. दुस-या दिवशी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित विविध उपक्रम घेण्यात आले. भौमितिक आकृत्याचे रेखाटन, अंकांची गाणी म्हणणे, ग्रंथालय पुस्तक वाचन, गोष्टींचे सादरीकरण आणि कथाकथन इ. उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी भरवून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सलग ७ दिवस हा शिक्षण सप्ताह सुरु राहणार असून क्रीडा, कला नि कौशल्यावर आधारित उपक्रम, गणितीय खेळ, शालेय पोषण आहार दिवस, तिथी, भोजन इ. प्रकारचे उपक्रम शाळेत घेण्यात येणार आहेत. या उपक्रमात शाळेतील शिक्षक आणि पालकसुद्धा सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवित आहेत.


stay connected