दिंडीतून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला
------------------
कडा / वार्ताहर
------------------
पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या दिंडीतील एक भाविक महिला मुक्कामाच्या ठिकाणावरून बेपत्ता झाली. १५ दिवसांनंतर तिचा मृतदेह सिना नदीपात्रात आढळला. आशा बर्डे (वय ४५, रा. खरवंडी, ता. नेवासा) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील दिंडी पंढरपूरला जाताना आष्टी तालुक्यातील खुंटेफळ गावात मुक्कामी होती. यामधील ४५ वर्षीय भाविक महिला तिथून बेपत्ता झाली होती. आषाढी एकादशीनंतर दिंडीतील सर्व वारकरी आपापल्या घरी परतले. मात्र, महिला आली नसल्याने शोधाशोध सुरू झाल्यानंतर नातेवाइकांशी संपर्क साधला. याच दरम्यान सिना नदीपात्रात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी अंभोरा पोलिसांशी संपर्क साधला. सदर बेपत्ता महिलेचे वर्णन व मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचे वर्णन मिळतेजुळते आढळून आल्याने नातेवाइकांनी शवविच्छेदना दरम्यान उपस्थित राहून ती महिला आशा जालिंदर बर्डे असल्याची खात्री पटविली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अशी माहिती अंभोरा पोलिसांकडून मिळाली आहे.
-----------%%-------
stay connected