आष्टीच्या उजमा शेखने प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत बनली पोलीस उपनिरीक्षक ! Success story

 आष्टीच्या उजमा शेखने प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत बनली पोलीस उपनिरीक्षक ! Success story






प्रतिकुल परिस्थीती वर मात करत जिद्दीने यशाची शिखरे काबीज करता येतात . याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आष्टीची युवती उजमा शेख होय . लहानपणीच वडिलांचे हरपलेले छत्र, आई शालेय पोषण आहाराचा भात शिजवण्याचे काम करते, त्यामुळे एकूण घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. त्यातच कुठलीही शिक्षणाची सोय नाही, परंतु, शिकण्याची जिद्द आणि मनोबल खंबीर करीत आष्टी येथील आझादनगरमधील उजमा शेख या तरुणीने पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळविला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १८ मार्च रोजी जाहीर झाला. ऑनलाइन जाहीर झालेल्या या निकालात उजमा शेख हिची पोलिस खात्यामध्ये खुल्या प्रवर्गातून उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

उजमा शेखचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण हंबर्डे महाविद्यालयात झाले. उजमाने पीएसआय व्हायचे स्वप्न बारावीत असतानाच पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करीत अपार जिद्दीने कामाला लागली.

आपली कौटुंबिक परिस्थिती हलाखिची असल्याची जाणीव तिला होतीच. परंतु, खडतर परिश्रम करत तिने सातत्याने अभ्यास केला. एमपीएससीने २०२० मध्ये घेतलेल्या पीएसआयच्या परीक्षेत तिने यशाचा झेंडा रोवला.

चार वर्षांची असताना वडिलांचे निधन

२७ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी उजमा चार वर्षांची होती. पुढे आईने सांभाळ करत तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. तिची आई सध्या आष्टी येथील कन्या शाळेमध्ये शालेय पोषण आहाराचा भात शिजवण्याचे काम करते. आई हीच माझा गुरु, तीच माझी आधारवड. तिच्यामुळेच यशाला गवसणी घालता आल्याची भावना व्यक्त करताना उजमाला गहिवरून आले.



बाथरूमलगतच केली अभ्यासाला जागा

घरही लहान असल्याने अभ्यास करण्यासाठी बाथरूमलगतच तिने स्टडीरूम तयार केली. लायब्ररी कम् स्टडीरुम असलेल्या या जागेतच तिने अभ्यास केला.

■ उजमाने १६-१६ तास अभ्यास करून हे यश मिळवले आहे. तिच्या संघर्षाचा प्रवास इतर मुलींना प्रेरणादायी ठरेल. तिच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रांतून तीचे कौतुक होत आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.