तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे : जयदत्त धस

 तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे : जयदत्त धस 



आष्टी प्रतिनिधी


आजची तरुण पिढी ही नोकरीच्या मागे धावण्यात खूप मोठा वेळ वाया घालत आहे.  केंद्र व राज्य सरकारच्या शेतीविषयक विविध वेगवेगळ्या योजना आहेत. याच योजनांचा लाभ घेऊन शेती केली तर नोकरीपेक्षाही मोठा फायदा तरुणांना होईल. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता आधुनिक शेती करून आपला उन्नतीचा मार्ग शोधावा असे आवाहन युवा नेते जयदत्त धस यांनी केले.

  ते आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टी मतदार संघातील चार जणांना शासनाने कृषी रत्न पुरस्कार जाहीर केले  आहेत त्यानिमित्त बाजार समितीने ठेवलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलत होते.

बाबासाहेब पिसोरे यांना पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, राजु सुपेकर तालुका कृषी अधिकारी यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार, केशव रसाळ यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार तर श्रीमती विजया घुले यांना जिजामाता कृषी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, उपसभापती नामदेव धोंडे, सचिव हनुमंत गळगटे व सर्व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना जयदत्त धस म्हणाले की, आष्टी तालुका हा कायम दुष्काळी तालुका आहे. तरीही या भागातील शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळबागा मोठ्या प्रमाणात लावल्या  आहेत त्यासाठी सुरेश आण्णा धस यांच्या माध्यमातून पंचायत समितीकडून शेततळे व सिंचन विहिरी दिल्यामुळे आष्टी तालुक्यामध्ये फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. दुष्काळी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर फळबागा झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला आहे .आता येत्या काही दिवसांमध्ये तालुक्याची जीवनवाहिनी ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू होणार आहे या तलावामध्ये सात टीएमसी पाणी येणार असल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन आष्टी तालुक्यातील शेतकरी हा सुखावणार आहे. या तलावाच्या कामासाठी सुरेश आण्णा धस यांनी मोठे कष्ट घेतले असून राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावला आहे. आष्टी तालुक्यातील दुष्काळी भागातील चार जणांना महाराष्ट्र शासनाने कृषी सेवा रत्न पुरस्कार दिल्याचा अभिमान असून पुरस्कारार्थीचे सर्वांचे काम इतरांनी प्रेरणा घेण्यासारखे असल्याचे जयदत्त धस यांनी सांगितले. याशिवाय केळसांगवी येथील विजया घुले या महिला असूनही त्यांनी सफरचंद ड्रॅगन फ्रुट व खजुराची शेती करून अफलातून उत्पन्न घेतले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी सत्कारला उत्तर देताना तत्कालीन तालुका कृषी अधिकारी राजू सुपेकर म्हणाले की, कडा कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहे. सुरेश धस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. आष्टी मध्ये चार वर्षे काम केले याचा अभिमान वाटतो. शेतकऱ्यांनी या पुढील काळात सुधारित बियाणे वापरून व सुधारित शेती केली तरच ती परवडू शकते अन्यथा शेती तोट्यात जाणारच आहे. त्यासाठी  शेतकऱ्यांनी सुधारित वाण, अत्याधुनिक अवजारे, खते बी बियाणे याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मी पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने सुरुवातीला मराठवाड्यातील आष्टी मध्ये नोकरी करण्यासाठी मन धासावत नव्हते मात्र आष्टी मध्ये नोकरी करण्याचे आव्हान स्वीकारून ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे समाधान वाटत असल्याचेही सुपेकर यांनी सांगितले .यावेळी अनिल तात्या ढोबळे, केशव रसाळ बाबासाहेब पिसोरे यांचीही भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव हनुमंत गळगटे यांनी केले. यावेळी सरपंच युवराज पाटील बाजार समितीचे संचालक संजय ढोबळे, राजेंद्र गव्हाणे, मधुकर सायबर, मुरलीधर फसले, अशोक लगड, परिवंत गायकवाड, राम मधुरकर, संजय मेहेर ,राजू हुलगे ,राजू शेठ पोखरणा ,योगेश भंडारी,सचिन घावटे, सुनील देशमुख,गोरख तरटे, अमोल साळवे बाळासाहेब ढोबळे ,राजू खलाटे ,जालिंदर नन्नवरे यांच्यासह व्यापारी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.