खुंटेफळ साठवण तलावासाठी जमिनी दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सुधारित दरा नुसार भूसंपादन मोबदला देण्याचा प्रयत्न करू..

 खुंटेफळ साठवण तलावासाठी जमिनी दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सुधारित दरा नुसार भूसंपादन मोबदला देण्याचा प्रयत्न करू..

 प्रकल्प निर्मितीसाठी इंजि.अशोक खेडकर यांचे मोठे योगदान..

 - आ.सुरेश धस प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा प्रयत्न..
 - माजी आमदार भीमराव धोंडे 





आष्टी (प्रतिनिधी)

 खुंटेफळ साठवण तलाव या प्रकल्पाची संकल्पना सन१९९९ पासून होती..

 हा प्रकल्प मंजूरीनंतर  सुरुवातीस आमच्या शब्दावर विश्वास ठेवून 

ज्या शेतकऱ्यांनी  प्रकल्पासाठी जमीन दिली त्या शेतकऱ्यांना  तत्कालीन मूल्यांकन प्रमाणे कमी मोबदला मिळाला आहे मात्र सद्यस्थितीमध्ये या पुढे मिळणारा मोबदला यामधील तफावत भरून काढून खास बाब अंतर्गत त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करू..

 हा प्रकल्प उभारणीसाठी इंजि.अशोक खेडकर यांचे मोठे योगदान असून त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेतल्यामुळे हा तलाव पूर्णत्वाकडे जात आहे.. असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले..

यावेळी व्यासपीठावर माजी आ.

भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,समाजसेवक विजय गोल्हार,युवानेते जयदत्त धस, अधिक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता घुगे,राष्ट्रवादीचे  तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,सरपंच परिषदेचे  प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,

कार्यकारी अभियंता महेश निरनाळे आदी उपस्थित होते. 

तर खुंटेफळ साठवण तलावास आमचा कधीही विरोध नव्हता तर तलावातील त्रुटी दूर होऊन शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठीच सतत प्रयत्न केले.. असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले..

 आष्टी येथील लघुपाटबंधारे उपविभाग भूम मुख्यालय आष्टी येथील उपअभियंता इंजि.अशोक खेडकर यांच्या सेवापूर्ती समारंभामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते..

 पुढे बोलताना आ. सुरेश धस म्हणाले की, इंजिनीयर हा अत्यंत कल्पक असतो या प्रकल्पाची त्यांनी अत्यंत कल्पकतेने मांडणी केल्यामुळेच मराठवाड्याच्या वाट्याचे ५.६८ टी.एम.सी. पाणी साठवण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे असे सांगून तत्कालीन दिवंगत अभियंता सुभाष थोरवे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शामराव कुलकर्णी आणि हा तलाव होऊ शकतो याचे सुतोवाच करणारे आणि नंतर या तलावाच्या मंजुरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विठ्ठलराव तांदळे यांचे ही या प्रकल्पासाठी मोठे योगदान आहे..

 असे सांगत इंजि. अशोक खेडकर यांचा या प्रकल्पामध्ये सिंहाचा वाटा असून सन २०१० पासून प्रकल्पाच्या सुरुवातीपासून शासन दरबारी आणि पाटबंधारे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित प्रकल्प बाधित शेतकऱ्यांशी अत्यंत सौहार्द पूर्ण संबंध ठेवून त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम केल्यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे असे सांगितले..सन १९९९ पासून आमदार झाल्यापासून मराठवाड्याचा वाट्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करत असताना कृष्णा खोऱ्यामध्ये  मराठवाड्यासाठी केवळ ०२ टी.एम.सी. पाणी शिल्लक असल्याचे दाखवले जात होते. मात्र हैदराबाद येथे जाऊन मुंतखब दस्तऐवज शोधण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांनी केले.. सन २००३ च्या दुष्काळामध्ये तात्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी ५३ हजार जनावरांची छावणीची पाहणी करताना या भागातील दुष्काळाची जाणीव शासनाला करून दिली होती..

 त्यानंतर कृष्णा खोऱ्यामध्ये आष्टी तालुक्याचा ९६ टक्के भाग येत असून ०४ टक्के गोदावरी खोऱ्यात समाविष्ट असल्याचे सांगितले..खुंटेफळ साठवण तलावाची जागाही नैसर्गिक अनुकूल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होऊ शकेल या उद्देशाने आपण ही जागा निवडली.. मात्र सुरुवातीला गैरसमजातून शेतकऱ्यांनी विरोध केला मात्र आम्ही सर्व सहन करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न केले.. आता या प्रकल्पाचे महत्त्व सर्व शेतकऱ्यांना लक्षात आल्यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे सुरुवातीला या तलावासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा भाव हा आजच्या तुलनेत कमी होता मात्र पूर्वीच्या सर्व शेतकऱ्यांना आजच्या भावाच्या तुलनेतील तफावतीची रक्कम मिळावी यासाठी खास बाब अंतर्गत शासनाकडून निधी आपण उपलब्ध करून घेणार आहोत..

 कोणत्याही जमीन मालक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले..

 महाराष्ट्र राज्यामध्ये थेट खरेदीने प्रकल्पासाठी भूसंपादन करणारा राज्यातील पहिला शासन निर्णय या प्रकल्पाचा झाला आहे ही ऐतिहासिक बाब असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या प्रकल्पामध्ये उजनी जलाशयातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या योजनेच्या निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर १५ व्या दिवशी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.. कदाचित हा जागतिक विक्रम असू शकेल असेही त्यांनी पुढे बोलताना त्यांनी सांगितले...

 आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ या योजनेची मुदत ३६ महिने असली तरी आगामी १८ महिन्यातच ही योजना पूर्ण करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.. त्यासाठी उप अभियंता अशोक खेडकर हे सेवानिवृत्त झाले असले तरी या प्रकल्पाच्या पूर्णत्वापर्यंत त्यांनी या प्रकल्पासाठी काम करावे यासाठी त्यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी शासनाची परवानगी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.. यावेळी बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले की, मेहेकरी मध्यम प्रकल्पाची उंची वाढवावी असा आमचा प्रयत्न होता आणि हा लपून-छपून विरोध करण्याचा विषय नसून या प्रकल्पातील त्रुटी दूर होऊन सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठीच आपण प्रयत्न केले असून आपल्या विधानसभा सदस्यत्वाच्या काळामध्ये पर्यावरणाच्या परवानगीसाठी आपण दिल्ली येथे जाऊन प्रयत्न केले आहेत ..

इंजि.अशोक खेडकर हे केवळ शासकीय अधिकारी नव्हे तर या भागातील कार्यकर्ता असल्यासारखे वावरले त्यांची या कामासाठी अत्यंत तळमळ दिसून येत होती असे सांगितले...

 तर माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की, या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर होणे आवश्यक असून शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे मात्र कोणत्याही कारणामुळे हे काम रखडू नये असे म्हणत या प्रकल्पाची विष्णुपुरी होऊ नये असे सांगितले..

 यावेळी बोलताना अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे म्हणाले की, खुंटेफळ साठवण तलावासाठी अशोक खेडकर यांनी मोठे परिश्रम आणि मेहनत केली असून त्यांच्या परिश्रममामुळे केवळ १.६८ टी.एम.सी. एवढ्या क्षमतेच्या कामाऐवजी ५.६८ टी.एम.सी. पाणी साठवणूक करता येईल असे काम सध्या चालू आहे.. उर्वरित भूसंपादनाचे काम देखील लवकरच सुरू होईल असे सांगितले.. यावेळी बोलताना खुंटेफळ साठवण तलावाचे सर्वेक्षण करणारे इंजि.महेश निनाळे म्हणाले की,

 या प्रकल्पासाठी काम करत असताना आमदार सुरेश धस यांच्यातील इंजिनिअर दिसून आला.. या तलावाचे स्थळ त्यांनीच निश्चित केले होते हे स्थळ कृष्ण खोऱ्यामधील सर्वात मोठे साठवण क्षमता असलेले आहे..

 थेट खरेदीने भूसंपादन होणारा हा प्रकल्प असून गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडे नियामक समितीच्या बैठकीमध्ये स्वतः आमदार सुरेश धस यांनी प्रस्तावातील वाक्यरचना दुरुस्ती करून अचूक प्रस्ताव सादर करण्यास आम्हाला मदत केली हे अविस्मरणीय आहे.. तांत्रिक माहिती असलेले हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व असल्याचे त्यांनी सांगितले ..

सत्काराला उत्तर देताना इंजि.अशोक खेडकर म्हणाले की, मी पाथर्डी सारख्या दुष्काळी भागातील असल्यामुळे पाण्याचे महत्व लक्षात घेऊन आपण आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाद्वारे निश्चित काही करू शकतो हे जाणवले आणि मला या कामाची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो..

 सुरुवातीला समज गैरसमज यातून मी युद्धभूमीवर काम केल्यासारखी परिस्थिती होती परंतु आपण शेवटपर्यंत संयम, संवाद आणि समाज यावर काम करून जो काम करेल तो चुकतो मात्र चूक सुधारण्याची क्षमता असल्यामुळे मी पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करू शकलो..

 सर्व लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद सोडून माझ्या कामाला पसंती दिल्यामुळेच मला चांगले काम करता आले राष्ट्रहिताचे आणि समाजासाठी काही काम करता आल्याचा अभिमान मला वाटत असून सर्वांच्या सहकार्यामुळेच मला पदाला न्याय देता आला अशी भावना व्यक्त केली...

 या कार्यक्रमांमध्ये कार्यकारी अभियंता घुगे यांचे समयोचित भाषण झाले..

यावेळी विक्रम पोकळे,सतीष देशपांडे, दिनकरराव तांदळे,प्रतिकदादा खेडकर,तानाजी जंजीरे,रविंद्र ढोबळे,सुरेश उगलमुगले,भारत खरमाटे,सरपंच प्रतिभाताई थोरवे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,सचिव शरद रेडेकर,जलसंपदा विभागातील अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव अहमदनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन पाथर्डी चे युवा नेते प्रतीक खेडकर यांनी केले..











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.