Agriculture News : कांदा झाला कवडीमोल तर लिंबू नव्वद रुपये पार : कांद्याला दर मिळेना शेतकऱ्यांच्या आशेवर फिरतोय नांगर
आष्टी (प्रतिनिधी)- कायम दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या आष्टी तालुक्यात गत दोन तीन वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आनंदी होता. यावर्षी काहीतरी पदरात पडेल या आशेने सर्वसामान्य शेतकरीवर्ग कांदा पिकाकडे वळला.गेल्या महिन्यात कांद्याला १५ ते १८ रुपये किलोचा भाव मिळत होता मात्र आता कांद्याच्या दराला उतरती कळा लागली असून गेल्या एक महिन्यापासून कांद्याचे भाव गडगडले आहेत. कांद्याचे भाव आठ ते बारा रुपये किलो झाले असून हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे सध्या लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने लिंबाची शेती करणारा शेतकरी सध्या समाधानी दिसत आहे. लिंबाने नव्वद रुपये दर पार केला आहे.
आष्टी तालुक्यात यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर बाजरभाव कमी झाले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे दिसून येत असतानाच सध्या लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकरी वर्ग सुखावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने आष्टी तालुक्यातील लिंबाला नगर पुणे मुंबई वाशी या बरोबरच परराज्यात मागणी वाढु लागली आहे. त्यामुळे लिंबाला चांगले दिवस आले आहेत.
एकीकडे महागाई दरदिवशी विक्रमी उच्चांक गाठत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, मिरची, मसाल्यांसह अनेक वस्तू महाग होत असताना कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कांद्याचे भाव असेच कमी होत राहिले तर शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक अडचणीत सापडतील. सध्या उन्हाळी कांदा बाजारात आला असून आठ ते बारा रुपये असा दर मिळत आहे. कांद्याला उत्पादन खर्च हा किलोला पंधरा रुपयाच्या आसपास येतो. सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली. त्याप्रमाणात मागणी कमी झाल्याने कांद्याच्या भावात घसरण होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सरकारने इतर पिकाप्रमाणे कांदा पिकास दिड हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊन शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
stay connected