धामणगांवमध्ये साकारणार अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती !

धामणगांवमध्ये साकारणार अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती ! 






धामणगांव । प्रतिनिधी 


   काल ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे खऱ्या अर्थाने मंदिर होणे समस्त भारतवर्षातील नागरिकांना अभिप्रेत होते, त्या अयोध्येमध्ये या भव्यदिव्य राममंदिराचे लोकार्पण त्याचप्रमाणे याठिकाणी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्या ठिकाणी मंदिर झाले ती प्रभूश्रीमाचंद्रांची जन्मभूमी आहे. म्हणूनच या जागेसाठी अनेक वर्षांपासून लढा उभारला गेला होता. हा लढा एकप्रकारे भव्यदिव्य लोकचळवळ झाली होती. याठिकाणी दोनवेळा कारसेवा झाल्या. न्यायालयीन प्रक्रियेने देखील प्रदीर्घ वेळ घेतला. परंतु खूप वर्षांनंतर का होईना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी आणि अन्य हिंदूत्ववादी संघटनांना यामध्ये यश आले आणि २०१९ ला विवादित स्थळावर राममंदिर उभारणीचा अध्यादेश न्यायव्यवस्थेने जारी केला. यानंतर मात्र प्रत्येक हिंदूच्या हृदयात अखेर कारसेवकांचा विजय झालाच, ही भावना निर्माण झाली. 





    काल दि.२२ जानेवारी रोजी अयोध्येतील रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र पर्वावर धामणगांव येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्रीरामचंद्र, माता सिता, भ्राता लक्ष्मण, हनुमंतराय आदी देवतांच्या वेशभूषेत असणाऱ्या कलावंतांची मिरवणूक, जिल्हा परिषद शाळेतील बालगोपाळांचे लेझीम पथक, फटाक्यांची आतषबाजी आणि सर्व जातीधर्मातील लोकांमधील प्रचंड उत्साहाने धामणगांव राममय झाले होते. भल्या पहाटे संपूर्ण गावामध्ये सडा, रांगोळी करुन स्वयंसेवकांनी, माताभगिनींनी मांगल्याचे वातावरण निर्माण केले होते. ज्या ज्या व्यक्तींनी या कारसेवेचे दिवस अनुभवलेले होते त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता.

    मिरवणूक झाल्यानंतर गावामध्ये असणाऱ्या राममंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र आले व मंदिराच्या मर्यादित जागेविषयी चिंता उपस्थित केली. ही चर्चा विठ्ठल जगताप आणि किसन जगताप या दोन्ही बंधूंपर्यंत गेली आणि क्षणाचाही विलंब न करता धामणगांव येथे भव्यदिव्य राममंदिर उभारणीसाठी ही जागा देण्याचे त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे धामणगांवकरांनी जगताप बंधूंचे आभार मानले व याच ठिकाणी अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्धार केला.






     याचसोबत १९९२ साली झालेल्या कारसेवेसाठी धामणगांव येथून स्व.गोविंदकाका भणगे, स्व.मधूकर देशपांडे, दत्तोबा चौधरी, भिवा खेमनर आणि दिलीप परदेशी ही मंडळी गेली होती. यापैकी दिलीप परदेशी हे एकमेव या घटनेचे साक्षीदार याप्रसंगी उपस्थित होते. खरोखरच ही मंडळी धामणगांवकरांचे भूषण आहेत. त्यांचा यथोचित सन्मान देखील धामणगांवकरांच्या वतीने भाजपा नेते संजय गाढवे व सरपंच मनोज गाढवे यांनी केला. यावेळी जैन श्रावक संघाच्या वतीने सर्व रामभक्तांना मोतीचूर लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.