वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल ?

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल ?



 राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन वातावरण पेटले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून उपोषणाचे शस्त्र उपसत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जेरीस आणले आहे. एकीकडे आरक्षणाचा लढा तीव्र होत असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणाला राज्यभरातील मराठा बांधवांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जरांगेच्या आवाहनानंतर गावागावांत आरक्षणासाठी आंदोलने होत असून राज्यात हिंसाचाराच्याही घटना घडत आहेत, याच पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे.

मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार असून या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते  हे वारंवार मराठा आरक्षणाला विरोध करताना दिसत असून मनोज जरांगे यांच्यावर ते सातत्याने टीका करत आहेत. या भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलकांनी सदावर्तेच्या गाड्यांचीही तोडफोड केल्याची घटना घडली होती.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.