मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा - आमदार बाळासाहेब आजबेंची राज्यपालांकडे मागणी
---------
आष्टी, दि. ३१ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराराष्ट्रात मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. परंतु, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने या आंदोलनास गेल्या दोन दिवसांपासून हिंसक वळण लागले आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज (दि. ३१) राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सोबत घेऊन केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आ बाळासाहेब आजबे यांच्यासह राष्ट्रवादीच्या 10 मराठा आमदारांनी राजभवनासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केले. दुपारनंतर महाराष्ट्राचे राजपाल यांनी वेळ देत राजभवनामध्ये चर्चा करण्यासाठी या आमदारांना पाचारण केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकदिवसीय विशेष अधिवेशन घेऊन तात्काळ आरक्षण देण्यात यावे अशी विनंती राज्यपाल मा. रमेश बैस यांच्याकडे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह उपस्थित आमदार यांनी केली. यावेळी आमदार आजबे यांच्यासह निलेश लंके, राजेश पाटील, यशवंत माने, बाबासाहेब पाटील, राजू नवघरे, मोहनराव हंबर्डे, कैलास पाटील, राहुल पाटील, माधवराव जवळगावकर हे आमदार उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे सर्व आमदार आरक्षणासाठी प्रयत्नशील असून सगळ्यांना आरक्षण मिळाले पाहीजे असे वाटते तसा पाठिंबाही राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी दिला आहे. धनगर समाजासह मुस्लिम समाजालाही काही प्रमाणात आरक्षण मिळाले पाहीजे. सरकारने या बाबींची गांभीर्याने नोंद घेवून सर्व बाजूला ठेवून तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे.
(आमदार बाळासाहेब आजबे)




stay connected