नवरात्रोत्सवासाठी देवीची ज्योत घेऊन धावणाऱ्या युवकांनी काळजी घ्यावी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांचे आवाहन
आष्टी ( प्रतिनिधी ) - आगामी घटस्थापना तथा नवरात्रोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी विविध ठिकाणच्या देवी देवस्थान येथून हातात देवीची ज्योत रुपी मशाल घेऊन गावोगावी येणाऱ्या युवकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी केले आहे.
आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावी आगामी घटस्थापना अर्थात नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी विविध देवीच्या देवस्थानावरून ज्योत घेऊन रस्त्याने मशाल हाती घेऊन युवक अखंडपणे धावत असतात. पायी ज्योत आणताना रस्त्यावरून धावताना या युवकांनी अनेक प्रकारे काळजी घेण्याची आवश्यकता असते . अखंडपणे धावत असताना दिवस आणि रात्र विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावरून धावणारी वाहने वेगात असतात. त्यामुळे धावणाऱ्या युवकांनी रस्त्याच्या मध्यभागातून न धावता रस्त्याच्या अगदी कडेने धावत यावे. यामध्ये थोड्या थोड्या अंतरावर ज्योत हस्तांतरित करावी. म्हणजे थकवा येणार नाही आणि कुठलाही अपघात होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी धावताना अंगावर रेडियम असलेले टी-शर्ट वापरावेत. त्यामुळे वाहनांना धावणाऱ्या युवकांचे अस्तित्वाची जाणीव होईल. तसेच यावेळी कोणत्याही प्रकारची स्पर्धा या करू नये. धावणाऱ्या युवकांनी अत्यंत भाविकपणे या कडे लक्ष देऊन सुरक्षितपणे आपल्या घरी वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांची काळजी असू द्यावी . देवी देवस्थान मंदिर ते आपले गाव या प्रवासादरम्यान बऱ्याचदा युवक आपण महामार्गावर धावत जात आहोत याचे भान ठेवत नाहीत . त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. आष्टी तालुक्यात यापूर्वी अशा अप्रिय घटना घडल्या असून युवकांना प्राण गमवावे लागले आहेत याचेही भान ठेवावे. त्यामुळे अत्यंत सुरक्षितपणे रस्ता पार करून ज्योत आपापल्या गावी आणावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी केले आहे . तसेच अधिक सुरक्षितता म्हणून ज्योत घेऊन धावणाऱ्या युवकाच्या च्या पाठीमागे असलेल्या मोटरसायकलवरील युवकांनी ज्योती पासून योग्य अंतर राहील याची खबरदारी घ्यावी . आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी . त्याचप्रमाणे या आनंदाचा उत्सवाला गालबोट लागेल असे वर्तन करू नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे

stay connected